केंद्र सरकार ईपीएस पेन्शन 7500 रुपये करण्याची शक्यता, पीएफ खात्यात व्याज कधी जमा होणार?
Marathi May 03, 2026 10:25 PM

नवी दिल्ली : एम्पलॉईज प्रॉविडंट फंड ऑर्गनायझेशन म्हणजेच ईपीएफओकडून मार्च महिन्याच्या सुरुवातीला आर्थिक वर्ष 2025-26 साठी 8.25 टक्के व्याज दर जाहीर केला होता. या व्याजदरानुसार व्याजाची रक्कम पीएफ खातेदारांच्या कधी जमा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ईपीएफच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजकडून व्याज दर निश्चित करण्यात आल्यानंतर यासंदर्भातील निर्णय केंद्रीय वित्त मंत्रालयानं घ्यायचा आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयानं व्याजाच्या रकमेसंदर्भात अंतिम निर्णय घेत त्याला मान्यता दिल्यानंतर निश्चित करण्यात येणाऱ्या व्याज दरानुसार व्याजाची रक्कम कोट्यवधि पीएफ खातेदारांच्या खात्यात जमा केली जाईल.

ईपीएस पेन्शन वाढीची शक्यता

पीएफ खातेदारांना लवकरच मोठे बदल पाहायला मिळू शकतात. केंद्र सरकार ईपीएसनुसार किमान पेन्शन वाढवण्यासंदर्भात विचार करत आहे. याशिवाय पीएफची रक्कम एटीएममधून काढण्यासंदर्भातील सुविधा देखील लवकरच सुरु होऊ शकते. ईपीएस-95 नुसार दिल्या जाणाऱ्या किमान पेन्शनची रक्कम 1000 रुपये इतकी आहे. केंद्र सरकार यामध्ये वाढ करण्याच्या विचारात असून किमान पेन्शनची रक्कम 7500 रुपये करण्यासंदर्भात विचार करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. ईपीएस पेन्शनची रक्कम वाढवण्यासंदर्भात कर्मचारी यूनियनकडून मागणी करण्यात आली आहे. तर, संसदीय समितीनं देखील किमान पेन्शनची रक्कम वाढवली जावी, अशी शिफारस केलेली आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे.

ईपीएफओचा नवा विक्रम

आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये ईपीएफओकडून 8.31 कोटी दावे मंजूर करण्यात आले आहेत. 2024-25 मध्ये जवळपास 6.01 कोटी दावे मंजूर करण्यात आले होते. 2025-26 मंजूर करण्यात आलेल्या दाव्यांपैकी 5.51 कोटी दावे  हे अॅडव्हान्स किंवा अंशत रक्कम काढण्यासंदर्भातील होते. ईपीएफओनं दावे मंजूर करण्याच्या प्रक्रियेचं ऑटोमेशन केलं आहे. 71.11 टक्के दावे तीन दिवसांमध्ये मंजूर केले जातात. गतवर्षी हे प्रमाण 59.19 टक्के इतकं होतं. यापैकी 6.68 कोटी दावे हे चेकचे फोटो अपलोड न करता मंजूर करण्यात आले आहेत. ईपीएफओनं 1.59 खाती बँक खात्यासोबत नियोक्त्याच्या मंजुरीशिवाय लिंक केली आहेत. ईपीएफओनं 70.55 लाख दावे मंजूर केले जे रक्कम वर्ग करण्यासंदर्भात होते.  याशिवाय 29.34 लाख सदस्यांनी त्यांची माहिती स्वत: अपडेट केली.

एप्रिल महिन्यात ईपीएफओनं 61.03 लाख दावे मंजूर केले आहेत. 98.70 टक्के दावे 20 दिवसांमध्ये मंजूर करण्यात आले, यामुळं ईपीएफओची कार्यक्षमता सुधारल्याचं पाहायला मिळतो.

ईपीएफओनं सक्रिय नसलेली पीएफ खाती सक्रिय करण्यासाठी ई-प्राप्ती नावाचा नवीन प्लॅटफॉर्म सुरु केला आहे. आधार बेस्ड अॅक्सेस मिळवत जुनी खाती पोर्टलवरुन सक्रिय करता येऊ शकतात. यूएएन क्रमांकासोबत जी खाती लिंक नव्हती ती सुरु करता येतील. मेंबर आयडी नसणाऱ्या खातेदारांना देखील याचा लाभ घेता येणार आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.