हिंगोली : ‘साधना सप्ताह’ अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल हिंगोली जिल्हा परिषदेच्या कार्याची राज्य पातळीवर दखल घेतली गेली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायगावडे यांचा मुंबईत गौरव करण्यात येणार आहे.
२ ते १० एप्रिल दरम्यान आयोजित ‘साधना सप्ताह’ कार्यक्रमात iGOT प्रणालीवरील नोंदणी व प्रशिक्षण उपक्रमात हिंगोली जिल्हा परिषदेनं उल्लेखनीय कामगिरी केली. याच कामगिरीच्या जोरावर ‘Tech वारी 2.0’ या राज्यस्तरीय कार्यक्रमात त्यांचा सन्मान होणार आहे.
हा सन्मान सोहळा शुक्रवार, ८ मे रोजी मंत्रालय, मुंबई येथील त्रिमूर्ती प्रांगणात दुपारी ३ ते ४.३० या वेळेत पार पडणार आहे. राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या निवडक अधिकारी व संस्थांचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे.
या सन्मानामुळे हिंगोली जिल्ह्याचा मान उंचावला असून जिल्हा परिषद प्रशासनाच्या कामगिरीची राज्य स्तरावर नोंद घेतली गेली आहे.