ही गरुडभरारी माझी, कोणी रोखू नका हो आता...
esakal May 07, 2026 12:45 AM

आज माधव पवार यांच्या नंबरवरून सकाळीच फोन आला. नाव दिसताच बरे वाटले. कारण गेल्या महिनाभरापासून ते अत्यावस्थ होते. माझ्या आठवड्यातून किमान दोन तरी चकरा हाॅस्पिटलमध्ये आणि घरी होतच होत्या. डॉक्टरांनी घरी नेण्याचा सल्ला दिला होता. त्यांना होत असलेला त्रास पाहवत नव्हता. गेल्या बारा-तेरा वर्षांपासून डायलेसिसची संख्या १६०० च्या पार गेली होती. फोन उचलल्यावर त्यांचा मुलगा बोलत होता. अखेर ते पहाटे चार वाजता गेल्याची वार्ता समजली. एक प्रिय मित्र आज आपल्यात नसल्याचा धक्का बसला. अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

मन भुतकाळात गेले.

ही गरुडभरारी माझी

कोणी रोखू नका हो आता

मी वीज होऊनी जाईन

दुनियेतून जाता जाता

या ओळी आहेत, कवी माधव पवार यांच्या. मनाला चटका लावणारी ही ‘गरुडभरारी’ ठरली. अतिशय संवेदनशील मनाच्या कवीला निरोप देताना अंत:करण दाटून येत आहे. ही वार्ता ऐकताच माझे मन भूतकाळात गेले.

कवी माधव पवार आणि माझा परिचय सुमारे तीस वर्षांपासूनचा. त्यांच्या अनेक मित्रांपैकी मी एक होतो. तसे तर त्यांचे मित्रमंडळ खूप मोठे. साहित्यक्षेत्रातील मी आणि मारुती कटकधोंड जिवलग होतो. अनेक कवीसंमेलनात आम्ही तिघांनी सहभाग नोंदवला. बऱ्याच ठिकाणी आमचा ‘त्रिमूर्ती’ म्हणून उल्लेख व्हायचा. एके काळी आम्ही तिघांनी अनेक काव्यमैफिली गाजवल्या. माधव पवार यांचे खुमासदार सूत्रसंचालन असायचे. या सूत्रसंचालनात ते आम्हां कवींची इतकी स्तुती करीत की आम्ही ओशाळून जायचो. ‘कौतुक करणाराचं मन आभाळाएवढं मोठं असतं, मागून ते मिळत नसतं, जन्मताच ते असावं लागतं.’ या त्यांच्या काव्यपंक्ती ठरलेल्या असायच्या.

ज्या कवीसंमेलनात माधव पवार यांची उपस्थिती असायची तेथे रसिक आवर्जून उपस्थित राहायचे. हातात कुठलाही कागद न घेता ते कविता सादर करायचे. त्यांच्या शेकडो कविता मुखोद्गत असायच्या. त्यांचे काव्यात्मक सूत्रसंचालन चालू असताना रसिक मंत्रमुग्ध होऊन जायचे. अनेक मान्यवर कवींच्या काव्यमैफिलीत माधव पवार याची कविता निश्चित टाळ्या मिळवून जायची. त्यांचे सादरीकरण अप्रतिम असायचे. पाठांतर, स्पष्ट उच्चार, योग्य ठिकाणी पॉज, शरीराची हालचाल, चेहऱ्यावरील हावभाव याचे अचूक टायमिंग ते साधायचे. त्यांची कविता रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असायची.

रांगड व्यक्तिमत्त्व, खणखणीत आवाज आणि प्रसंगानुरूप काव्यपंक्ती त्यांच्या मुखातून बरसायच्या. त्यांची ओळख करून देताना ‘चेहरा वाघासारखा, डोळे हरणासारखे व काळीज सशासारखे असणारा कवी’ असा उल्लेख व्हायचा. त्यांच्या वाणीत, मुखात सरस्वतीचा वावर असायचा. सहज बोलतानाही त्यांच्या मुखातून कविता बरसायच्या. ते स्वभावाने परखड व निर्भीड होते. सत्याची कास धरणारे होते. प्रचंड स्वाभिमानी होते.

भरल्या व्यासपीठावरूनही तेे एखाद्या व्यंगावर निर्भिडपणे टीकास्त्र सोडायचे. चुकलेल्यांची ते गय करत नसायचे. ते नेहमी म्हणायचे, ‘अलीकडे लोक गुंडांना घाबरत नाहीत, पण कवींना घाबरतात.’ त्यांचे शब्द ऐकल्यानंतर त्यांच्याच या वाक्याची प्रचिती यायची. एखाद्यात एखादा चांगला गुण असेल तेे मुक्तकंठाने स्तुतीही करायचे. त्यांच्या सहवासात मलाही ‘कवी’ म्हणून बऱ्यापैकी प्रसिद्धी मिळाली. ‘माधव पवारचा मित्र’ म्हणून लोक ओळखू लागले.

माधव पवार यांनी आरोग्य विभागात लिपिक या पदावर प्रदीर्घ सेवा केली. शासकीय सेवेत ‘वरचा पैसा’ मिळण्याची संधी असूनही ते नेहमी भ्रष्टाचारापासून दूर राहिले. कष्टाच्या, घामाच्या पैशाची किंमत ते जाणून होते. ते नेहमी सांगायचे-ते नवीन नोकरी लागल्यावर त्यांचे पिताश्री कवी रा. ना. पवार यांनी त्यांना सक्त ताकीद होती- ‘तू आता सरकारी नोकरी लागलास, तू भ्रष्टाचाराचा एक रुपया जरी खाल्ल्याचे मला कळाले तर मी आत्महत्या करेन’ आणि हीच वडिलांची आज्ञा त्यांनी जन्मभर पाळली.

लहानपणी त्यांनी दु:ख-दारिद्र्याचा सामना केला. त्यामुळे ‘मला सुखाची भीती वाटते’ असे तेे नेहमी म्हणायचे. वडिलांनी दिलेल्या तत्त्वनिष्ठेची शिदोरी त्यांनी जन्मभर जपली. ‘श्रीमंताकडे जसा पैशाचा माज असतो, तसा कवीकडे तत्त्वनिष्ठेचा माज असायलाच पाहिजे’ असे त्याचे मत होते.

ते काम करीत असलेल्या शासकिय रुग्णालयात एखादा गरीब रुग्ण आल्यास त्याला पैशाची मदत ते करायचे. अनेक रुग्णांचे केसपेपरचे पैसे तेे स्वत:च्या खिशातून भरायचे. गरीबांविषयी, वंचित व पिडितांविषयी त्यांच्या मनात कळवळा असायचा.

आपले पिताश्री कविवर्य रा. ना. पवारांचे ऋण त्यांनी आयुष्यभर मानले. कोणत्याही कविसंमेलनात आपल्या वडिलांची एखादी आठवण सांगायचेच. एखाद्याने त्यांना ‘आपण वडिलांची काव्यपरंपरा पुढे नेत आहात, वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकून जात आहात, याचा आम्हांला अभिमान वाटतो.’ असे म्हटले तर तेे म्हणायचे, ‘वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकण्याची माझी पात्रता नाही, पण वडिलांच्या पावलांवर मस्तक ठेवून मात्र मी जात आहे.’ ते आपल्या एका कवितेत म्हणतात,

“बाप माझा कवी होता/ हा दोष का माझा आहे?/

कविता रक्तातून आली/ अभिमान मला याचा आहे ”

रा.नां.च्या मृत्यूनंतर कविवर्य रा. ना. पवार प्रतिष्ठानची स्थापना झाली. प्रतिष्ठानचा ते अध्यक्ष होते. त्या माध्यमातून त्यांनी अनेक साहित्यिकांच्या साहित्यकृतींना पुरस्कार प्रदान केले.

अनेक नामवंत कवींचा त्याला प्रत्यक्ष सहवास लाभला होता. फ.मुं. शिंदे, विठ्ठल वाघ या कवींच्या ते संपर्कात असायचे. एकदा कवी ग्रेस त्यांच्या अखेरच्या क्षणी हॉस्पिटलमध्ये असताना माधव पवार यांनी त्यांची आवर्जून भेट घेतली होती. त्यांना आपली कविता ऐकवली. वास्तविक पाहाता कवी ग्रेससारख्या महाकवीपुढे एखाद्या कवीने आपली कविता सादर करणे हे खूपच धाडसाचे होते. परंतु माधव पवार यांनी मात्र आपली कविता त्यांच्यापुढे सादर करून त्यांच्याकडून शाबासकीही मिळवली. कवी सुरेश भट यांचाही त्यांना सहवास लाभला होता. ते अनेक वेळा माधव पवारांच्या घरी आले होते. त्यांची सेवाही करण्याचे भाग्य माधव पवारांना लाभले.

सेवानिवृत्तीनंतर आपल्याला कवितेसाठी भरपूर वेळ द्यायला मिळेल म्हणून ते आनंदला होते. पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. अल्पावधीतच त्यांच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्याचे निदान झाले. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे आठवड्यातून तीन वेळा डायलेसिसला जावे लागे. डायलेसिस म्हणजे वेदना. या वेदना सहन करत करत ते शेवटची बारा-तेरा वर्षे जगत होते. या कलावधीत जणू त्यांनी मृत्यूलाच थोपवले होते. यातही त्याने विक्रम केला.

१६५० डायलेसिस पूर्ण केले. सुरवातीच्या काळात त्यांच्यासोबत असलेले व नंतर आलेले डायलेसिस करत असलेले जवळ जवळ सर्व रुग्ण हे जग सोडून गेले. परंतु तीव्र इच्छाशक्ती, कवितेचा सहवास, स्वभावातली सकारात्मकता यामुळे दोन्ही किडण्या निकामी होऊनही ते नेहमी आनंदात असायचे. कवीसंमेलनास किंवा साहित्यिक कार्यक्रमांना ते आवर्जून हजेरी लावायचे.

डायलेसिस कमी की काय म्हणून त्याच्यावर मध्यंतरी अँजोप्लास्टीची शस्रक्रियाही झाली. मणक्याचा आजारही अधूनमधून डोके वर काढत असे. आठवड्यातील तीन दिवस डायलेसीस आणि रोज तीन वेळ मूठ मूठ गोळ्यांचा खुराक ते नियमितपणे खात होते. चारूलता पवार यांनी त्याची खूप सेवा केली. त्यांना डायलेसिससाठी पहाटे पाचला हॉस्पिटलला नेणे, आणणे, वेळेवर गोळ्या देणे, जेवण देणे हा पत्नीधर्म त्यांनी कटाक्षाने पार पाडला. ते नेहमी म्हणायचा, ‘माझी बायको आहे म्हणून आज मी आहे. खरेच आपण कवीलोक नशीबवान आहोत. आपल्याला बायका चांगल्या मिळाल्या. आपण अशी वेडी माणसं. त्यांना सांभाळणारी बायको शहाणी भेटली म्हणूनच आपला संसार नीट चालतोय.’

त्यांनी कवितेबरोबरच अनेक गीते, लावण्या लिहिल्या. टी सेरीजसारख्या नामांकित कंपनीने त्यांच्या कॅसेटस् काढल्या. आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, प्रल्हाद शिंदे, सुरेश वाडकर, आदर्श शिंदे, सुरेखा पुणेकर, सुहास सदाफुले, जगदीश गोरसे, शकुंतला जाधव अशा गायकांनी त्याची गाणी म्हटली. अकलूज येथे भरलेल्या लावणी महोत्सवात त्यांनी लिहिलेल्या लावण्यांना सलग चार वर्षे पारितोषिके मिळाली. कविता व नकलांचे त्यांनी पाचशेच्या वर प्रयोग केले.

सोलापूर येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय सहित्य संमेलनाचे स्वागतगीतही त्यांचेच नावावर आहे. आकाशवाणी, दूरदर्शनवर त्यांचे अनेकदा काव्यवाचन झाले. त्याचे ‘हे शुभ शकुनांचे पक्षी’ आणि ‘गरुडभरारी’ हे दोन काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. ‘केशवसुतांचा वारसदार’ या पुरस्कारासह अनेक साहित्य पुरस्कारांचा त्यांच्यावर वर्षाव झाला.

माधव पावर आपलं आयुष्य मनस्वी जगले. अनेकांना त्यांनी मदत केली. नवीन कवींना ते मागितल्यावर लगेच प्रस्तावना, मलपृष्ठ मजकूर द्यायचे. एखाद्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलावल्यावर त्यांनी कधीच आढेवेढे घेतले नाहीत. ‘नवीन कवींना आपणच प्रोत्साहन दिले पाहिजे’ असे ते नेहमी म्हणायचे.

नुकताच त्यांचा ७ मार्चला ७१ वा वाढदिवस साजरा झाला. मी व मारुती कटकधोंड त्यांच्या वाढदिवसाला त्यांच्या घरी आवर्जून पुष्पगुच्छ घेऊन जायचो. तेेही माझ्या व मारुतीच्या वाढदिवसादिवशी आवर्जून आमच्या घरी येऊन शुभेच्छा द्यायचे.

नुकताच त्याचा ‘गरुडभरारी’ हा काव्यसंग्रह आमच्या शिवप्रज्ञा प्रकाशनामार्फत काढण्याची संधी मिळाली होती. ‘गरुडभरारी’ या कवितेत तेे म्हणतात,

“संपता दिव्यातील तेलही आता

ती ज्योत म्हणूनी फडफडते

प्राणपाखरू उडून चालले

काळीज समईचे तडफडते

निर्माल्याचे व्रत हे घेऊनी

आग चितेची धडधडते

वास्तवाचे दर्शन देण्या

वीज नभीची कडकडते”

अशा मृत्यूची चाहूल लागलेल्या अनेक कविता त्यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात लिहिल्या. त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावे लागायचे. तेथे भेटायला गेल्यावर ते मला नेहमी च्येष्टने महणायचे, ‘भोसले, आता माझ्यावर लेख लिहा, मी घरी जातो की नाही हे सांगता येत नाही. अहो तुम्ही आता लेख लिहिला तर मला जीवंतपणी वाचायला तर मिळेल. मी गेल्यावर त्या लेखाचा माझ्यासाठी काय उपयोग.’ मृत्यूशय्येवर असतानाही त्यांच्या विनोदी स्वभावाचे दर्शन व्हायचे. आणि खरोखरच आता त्यांच्यावर मला लेख लिहिण्याची ही दुर्देवी वेळ आली. याचे मला वाईट वाटते.

मृत्यूची कधी भीती वाटलीच नाही. मृत्यूचीही तेे मस्करी करायचे. आपल्यावर झालेल्या डायलेसिसची संख्या तेे अभिमानाने सांगायचे. आपला हात सुया टोचून असा झाला, हे आवर्जून दाखवायचे. जणू आजार हे त्यांचे अलंकारच झाले होते. ते वेदनेने कधी दमले नाहीत की खचला नाहीत. वेदनाच त्यांच्या पायाशी लोळण घ्यायच्या.

नुकताच ७ मार्चला त्यांचा ७१ वाढदिवस होता. दरवर्षीप्रमाणे शुभेच्छा देण्यासाठी मी व मारुती कटकधोंड त्यांच्या घरी गेलो होतो. बरेच थकलेले व खंगलेले वाटले. पण कवितेचा विषय निघाल्यावर मात्र त्यांचा आजार पळून जायचा. चेहरा आनंदाने खुलायचा. कवितेने तर त्यांचे आयुष्य वाढवले होते. दुर्देवाने हा त्याचा शेवटचा वाढदिवस ठरला.

मृत्यूशी झुंजणारा तेे एक योद्धा होते. मृत्यूला त्यांनी अनेक वेळा हुलकावणी दिली होती. शेवटपर्यंत त्यांचे मन तरुण आणि उत्साही होते. इच्छाशक्ती प्रबळ होती.

माधव पवार आम्हां मित्रांना परके करून गेले. एक सच्चा, दिलदार, प्रामाणिक, आदर्शवादी मित्राला आम्ही मुकलो आहोत. ते शरीराने गेले असला तरी त्यांच्या गीतांच्या, कवितांच्या, विचारांच्या रूपाने अजरामर झाले आहेत. सोलापूरच्या काव्यपरंपरेचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जाईल त्या वेळी माधव पवार यांचे नाव घेतल्याशिवाय तो पूर्ण होणार नाही. मित्रा, तुझ्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

- राजेंद्र भोसले, ज्येष्ठ साहित्यिक, प्रकाशक

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.