Akola News: रक्तदानातून वाचू शकतात अनेक जीव; 'एकत्र या, थॅलेसेमियाला हरवा'; जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त संदेश
esakal May 08, 2026 12:45 PM

अकोला: दरवर्षी ८ मे रोजी जगभरात ‘जागतिक थॅलेसेमिया दिन’ साजरा केला जातो. थॅलेसेमिया या आनुवंशिक रक्तविकाराबाबत समाजात जनजागृती निर्माण करणे, रुग्णांना योग्य उपचार उपलब्ध करून देणे आणि प्रतिबंधात्मक उपायांची माहिती पोहोचवणे हा या दिवसामागील प्रमुख उद्देश आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर विवाहपूर्व रक्त तपासणी, वेळेवर निदान आणि स्वेच्छा रक्तदान यांचे महत्त्व अधिक अधोरेखित होत आहे.

थॅलेसेमिया हा रक्तातील हिमोग्लोबिन तयार होण्यातील दोषामुळे होणारा आनुवंशिक आजार आहे. हिमोग्लोबिन हे शरीरात ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करते. मात्र या आजारात शरीर पुरेशा प्रमाणात निरोगी लाल रक्तपेशी तयार करू शकत नाही. परिणामी रुग्णांमध्ये रक्ताची कमतरता निर्माण होते आणि त्याचा थेट परिणाम शारीरिक विकासावर होतो.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, थॅलेसेमिया हा संसर्गजन्य आजार नसून तो पालकांकडून मुलांमध्ये आनुवंशिकरीत्या येतो. त्यामुळे केवळ उपचार नव्हे, तर प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देणे अत्यंत गरजेचे आहे.

विजय MGR बनले तर...? तामिळनाडूत सत्तेसाठी सुरू मोठा राजकीय गेम, AIADMK अन् DMK मध्ये संभाव्य युती, भाजपचीही एंट्री थॅलेसेमियाचे दोन प्रकार; ‘मायनर’ आणि ‘मेजर’

वैद्यकीय क्षेत्रात थॅलेसेमियाचे मुख्यतः दोन प्रकार सांगितले जातात. थॅलेसेमिया मायनर असलेल्या व्यक्तींना सहसा गंभीर त्रास जाणवत नाही. ते सामान्य जीवन जगू शकतात; मात्र ते या आजाराचे वाहक असतात. तर थॅलेसेमिया मेजर हा गंभीर प्रकार मानला जातो. या रुग्णांना दर काही आठवड्यांनी रक्त चढवावे लागते. उपचारात खंड पडल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. थॅलेसेमिया मेजर असलेल्या मुलांना लहान वयापासूनच नियमित वैद्यकीय देखरेखीची गरज असते. योग्य उपचारांमुळे त्यांचे आयुष्य अधिक चांगले आणि सुरक्षित होऊ शकते.

विवाहपूर्व तपासणीवर भर

थॅलेसेमियावरील सर्वात प्रभावी उपाय म्हणजे विवाहपूर्व रक्त तपासणी. जर मुलगा आणि मुलगी दोघेही थॅलेसेमिया मायनर असतील, तर त्यांच्या अपत्याला थॅलेसेमिया मेजर होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. समुपदेशन आणि रक्त तपासणीद्वारे थॅलेसेमिया मोठ्या प्रमाणात रोखता येऊ शकतो. समाजात अजूनही या विषयाबाबत पुरेशी जागरूकता नाही, असे मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केले.

Shaktipeeth Highway New Alignment : कोल्हापूरातील ७८ गावांतून जाणार ‘शक्तिपीठ’ महामार्ग; तालुकानिहाय गावांची यादी जाहीर, नव्याने अधिसूचना जारी रक्तदानातून मिळते जीवनदान

थॅलेसेमिया रुग्णांसाठी नियमित रक्त उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे स्वेच्छा रक्तदान ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून अनेकांसाठी जीवनदान ठरते. विविध सामाजिक संस्था, रक्तपेढ्या आणि आरोग्य विभागाकडून नागरिकांना नियमित रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘एका रक्तदात्यामुळे थॅलेसेमिया रुग्णाला नवजीवन मिळू शकते,’ असा संदेश यानिमित्ताने देण्यात येत आहे.

लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

थॅलेसेमियाची काही लक्षणे सुरुवातीपासूनच स्पष्ट दिसून येतात. सतत थकवा जाणवणे, चेहरा फिकट दिसणे, वजन आणि उंचीची वाढ मंदावणे, वारंवार ताप येणे, श्वास घेण्यास त्रास होणे यांसारखी लक्षणे आढळल्यास तातडीने तपासणी करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. विशेषतः लहान मुलांमध्ये अशक्तपणा वाढत असल्यास पालकांनी याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. वेळेवर निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावी ठरतात.

"थॅलेसेमिया हा आनुवंशिक रक्तविकार असून त्याबाबत प्रत्येकाने जागरूक राहणे आवश्यक आहे. ज्या कुटुंबात थॅलेसेमियाचा रुग्ण आहे, त्यांनी संपूर्ण कुटुंबाची तपासणी करून घ्यावी. वेळेत निदान झाल्यास योग्य उपचार व आवश्यक काळजी घेणे शक्य होते. तसेच विवाहापूर्वी मुलगा आणि मुलगी दोघांनीही थॅलेसेमियाची तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे भविष्यात जन्माला येणाऱ्या मुलांमध्ये हा आजार टाळता येऊ शकतो. समाजात थॅलेसेमियाबाबत जनजागृती वाढविणे ही काळाची गरज आहे."

- डॉ. आरती कुलवाल, जिल्हा शल्यचिकित्सक, अकोला

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.