शेअर बाजारात 99 टक्के बोगस कमाई, 15 लाख कोटींचा ढपला अन् याच राजेश एक्सपोर्ट्समध्ये LICची 10.8 टक्के हिस्सेदारी! देशातील महाघोटाळा असल्याची चर्चा
जयदीप मेढे June 05, 2026 09:13 PM

Rajesh Exports Financial Fraud: बाजार नियामक सेबीने बंगळूर-स्थित ज्वेलरी कंपनी राजेश एक्सपोर्ट्स लिमिटेड आणि तिचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, राजेश मेहता यांच्या विरोधात अंतरिम आदेश जारी केला आहे. कंपनीवर आर्थिक माहितीमध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार करणे, प्रवर्तकांशी संबंधित संस्थांमार्फत निधीचा अपहार करणे आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये गंभीर त्रुटी असल्याचा आरोप आहे. सेबीच्या तपासानुसार, राजेश एक्सपोर्ट्सने आर्थिक वर्ष 2021 ते 2025 दरम्यान अंदाजे 15.15 लाख कोटी रुपयांच्या एकत्रित महसुलाची चुकीची माहिती दिली. यापैकी 99.8 टक्के महसूल फुगवून दाखवण्यात आला होता.

राजेश एक्सपोर्ट्समध्ये एलआयसीची 10. 8 टक्के हिस्सेदारी

बातमी समोर येताच कंपनीचे शेअर्स 5 टक्के लोअर सर्किटमध्ये लॉक झाले, म्हणजेच बाजारात फक्त विक्रेते होते, खरेदीदार नव्हते. या संशयित घोटाळ्याचा थेट परिणाम सरकारी मालकीच्या विमा कंपनी एलआयसीवरही झाला आहे, जिची राजेश एक्सपोर्ट्समध्ये 10. 8 टक्के हिस्सेदारी आहे.

कोण आहे राजेश मेहता?

20 जून 1964 रोजी बंगळूरु येथे जन्मलेल राजेश मेहता हे राजेश एक्सपोर्ट्सचे अध्यक्ष आहेत. ते सोने आणि दागिन्यांच्या उद्योगातील एक सुप्रसिद्ध नाव आहेत. बंगळूरु येथील सेंट जोसेफ स्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर, मेहता लहान वयातच वडिलांच्या दागिन्यांच्या व्यवसायात सामील झाले. 1982 च्या दशकाच्या सुरुवातीला, मेहता आणि त्यांचे भाऊ प्रशांत यांनी चांदीच्या दागिन्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांच्या थोरल्या भावाकडून ₹1,200 कर्ज घेतले. हा तो काळ होता जेव्हा भारतातील दागिन्यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात असंघटित होता.

या सगळ्याची सुरुवात कशी झाली?

ते लवकरच दक्षिण भारतात तसेच गुजरात आणि मुंबईसारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये चांदीच्या दागिन्यांचे एक अग्रगण्य घाऊक विक्रेते बनले. 1995 मध्ये, राजेश एक्सपोर्ट्सने आयपीओद्वारे भांडवली बाजारात प्रवेश केला आणि ₹10 कोटी उभारले. त्यानंतर, कंपनीने सोन्याच्या मूल्य साखळीत प्रवेश केला, ज्यामध्ये शुद्धीकरण आणि उत्पादनापासून ते किरकोळ विक्रीपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. 2015 मध्ये, राजेश एक्सपोर्ट्सने 400 दशलक्ष डॉलर्समध्ये स्विस रिफायनरी व्हॅलकॅम्बीचे अधिग्रहण करून प्रसिद्धी मिळवली होती. हा व्यवहार पूर्णपणे रोख रकमेवर आधारित होता, ज्यामुळे कंपनीला जागतिक स्तरावर आपला विस्तार करता आला. फोर्ब्सच्या मते, ऑक्टोबर 2019 पर्यंत मेहतांची एकूण संपत्ती 1.57 अब्ज डॉलर्स होती.

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.