उत्तम गुंतवणूक : निफ्टी इंडिया डिफेन्स निर्देशांक : गुंतवणुकीची आकर्षक संधी
esakal June 22, 2026 09:45 AM

ऋत्विक जाधव, तांत्रिक विश्लेषक

गेल्या काही वर्षांत निफ्टी इंडिया डिफेन्स निर्देशांक हा भारतीय शेअर बाजारातील सर्वांत दमदार कामगिरी करणाऱ्या थीमॅटिक निर्देशांकांपैकी एक ठरला आहे. केंद्र सरकारचे संरक्षण क्षेत्रावरील वाढते लक्ष, संरक्षण खर्चातील सातत्यपूर्ण वाढ, स्वदेशी उत्पादनाला मिळणारे प्रोत्साहन आणि वाढणारी निर्यात यामुळे या क्षेत्राला भक्कम आधार मिळत आहे.

तांत्रिक विश्लेषणाच्या दृष्टीने पाहिल्यास, साप्ताहिक चार्टवर अत्यंत सकारात्मक रचना तयार झालेली दिसते. या निर्देशांकाने ५,००० अंशांच्या आसपासच्या पातळीपासून ८५०० अंशांच्या वरपर्यंत जोरदार उसळी घेतल्यानंतर काही काळासाठी ‘टाइम करेक्शन’ केले. या कालावधीत चार्टवर ‘क्लासिक बुलिश फ्लॅग पॅटर्न’ तयार झाला. अशा प्रकारचे पॅटर्न सहसा मोठ्या तेजीच्या प्रवासातील विश्रांतीचे टप्पे मानले जातात. अलीकडील किंमत हालचालींवरून निर्देशांकाने या फ्लॅग पॅटर्नमधून यशस्वी ब्रेकआउट दिल्याचे स्पष्ट दिसून येते. विशेष म्हणजे ब्रेकआउटनंतर निर्देशांकाने पुन्हा एकदा ब्रेकआउटच्या पातळीपर्यंत माघार घेतली.

ही घसरण म्हणजेच बाजारातील अल्पकालीन गुंतवणूकदारांना बाहेर काढण्याचा व मजबूत गुंतवणूकदारांकडून खरेदी वाढविण्याचा टप्पा असल्याचे दिसते. मजबूत तेजीच्या ट्रेंडमध्ये अशा रिटेस्ट अनेकदा पाहायला मिळतात आणि पुढील वाढीसाठी मजबूत पाया तयार करतात. सध्या निर्देशांकाने पुन्हा एकदा या रिटेस्ट झोनमधून वरची दिशा पकडली असून, तो नव्या उच्चांकांच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे तेजीची रचना आणखी मजबूत झाली आहे. चार्टनुसार, पुढील काळात निर्देशांक नवा उच्चांक गाठण्याची शक्यता दिसते. तांत्रिकदृष्ट्या ८४०० ते ८७०० अंशांचा पट्टा आता मजबूत सपोर्ट झोन म्हणून उदयास आला आहे. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हा भाग टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यासाठी आकर्षक मानला जाऊ शकतो. जोपर्यंत हा निर्देशांक या पातळीच्या वर टिकून आहे, तोपर्यंत व्यापक तेजीचा कल कायम राहण्याची शक्यता आहे.

(डिस्क्लेमर ः वरील शिफारस पूर्णपणे तांत्रिक विश्लेषणावर आधारित आहे, जी भविष्यातील भावाच्या हालचालीचा अंदाज लावण्याचा एक वैज्ञानिक मार्ग आहे. गुंतवणूकदारांनी इक्विटी गुंतवणुकीतील जोखमींबद्दल योग्य माहिती घ्यावी. माझे यात कोणतेही वैयक्तिक हितसंबंध नाहीत व यामध्ये माझी गुंतवणूक नाही. मात्र, आमच्या ग्राहकांची काही गुंतवणूक असू शकते.)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.