लोणावळा : मुसळधार पावसामुळे राजमाची मार्गावर मोठी दरड कोसळल्याने हा महत्त्वाचा रस्ता काही काळ वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला होता. त्यामुळे राजमाची परिसरातील ग्रामस्थांसह पर्यटनासाठी आलेले शेकडो पर्यटक अडकून पडल्याने काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
दरड कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने बचाव व मदतकार्य सुरू केले. डेला रेस्क्यू टीम, प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी तसेच राजमाची परिसरातील ग्रामस्थांनी जेसीबी व इतर यंत्रसामग्रीच्या साहाय्याने रस्त्यावर पडलेले दगड, माती आणि झाडे हटविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. त्यामुळे हा रस्ता तातडीने खुला झाला.