Maharashtra Rain : राज्यभरात गेल्या काही दिवसापासून धुवाधार पावसाच्या (Maharashtra Rain) सरी बरसात आहे. अशातच मुंबईसह उपनगरात मात्र मुसळधार पावसाचा रौद्रावतार बघायला मिळाला आहे. मुंबईतील मानखुर्द (Mankhurd) भागात एका तीन मजली चाळीचा भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. धोकादायक असलेली ही चाळ रिकामी करण्यासाठी घरातील सामान आवरत असतानाच अचानक पावसाने घात केला आणि संपूर्ण घर कोसळले. या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्यामुळे 6 निष्पाप लहान मुले आणि एका महिलेसह 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर राज्यात अनेक भागात दुर्घटना होऊन जीवितहानीसह जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. अशातच आज (6 जुलै) देखील पावसाचा कहर कायम राहणार असून हवामान विभागाने (IMD) राज्यातील अनेक जिल्ह्यांना खबरदारीचा इशारा दिला आहे. तसेच संभाव्य धोका लक्ष्यात घेता योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Maharashtra Rain Alert)
Maharashtra Rain Alert: मुंबईसह राज्यभरात कुठे-कुठे पावसाचा अलर्ट?
मुंबई प्रमाणेच कोकणात देखील मुसळधार पावसाचा कहर बघायला मिळत आहे. अशातच प्रादेशिक हवामान विभागाने आज पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधालर ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला. परिणामी, कोकण विभागात पावसाचा सर्वाधिक प्रभाव कायम राहणार असल्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यांत अतिवृष्टीची शक्यता असल्याने रेड अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. पुणे शहरासाठी पावसाचा यलो अलर्ट वर्तवण्यात आला आहे. तसेच पुणे आणि सातारा घाटामाथा परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज असून रेड अलर्टचा अंदाज वर्तवलेला आहे. नाशिक जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्टचा अंदाज आहे. तसेच घाटमाथा परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Mumbai Rain : मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये पहाटेपासून मुसळधार; वाहनांच्या गतीवर परिणाम
मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली आणि दहिसर परिसरात जोरदार पावसामुळे वाहनांच्या गतीवर परिणाम झाला आहे. आज सोमवार असल्याने आठवड्याचा पहिलाच कार्यालयीन दिवस आहे. त्यामुळे सकाळच्या गर्दीच्या वेळेत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी वाहतुकीची माहिती तपासून पुरेसा वेळ हाताशी ठेवावा, तसेच अत्यावश्यक काम असल्यासच प्रवास करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. हवामान विभागाने आजही मुसळधार पावसाचा इशारा दिला असून पुढील काही तासांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या