मुंबई : मुंबई-पुण्यासह राज्यभरात अनेक ठिकाणी पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र आहे. हा पाऊस पुढचे दोन दिवस म्हणजे, 8 जुलै पर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे. अशा स्थितीत आपत्कालीन यंत्रणांनी 24 तास युद्धपातळीवर काम करावं, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आवश्यकता असल्यास नागरिकांनी घराबाहेर पडावं, कर्मचाऱ्यांनी 'वर्क फ्रॉम होम'चा (Work From Home) अवलंब करावा असंही मुख्यमंत्र्यानी सांगितलं.
मुंबई आणि पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनने रौद्र रूप धारण केले असून सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस म्हणजेच 8 जुलैच्या रात्रीपर्यंत राज्यामध्ये मुसळधार पावसाचा 'रेड अलर्ट' कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.
या गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य आपत्ती नियंत्रण कक्षामध्ये एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व खासगी कंपन्या आणि आस्थापनांना अत्यंत कडक निर्देश दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सद्यस्थिती पाहता खासगी कंपन्यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'ची (Work From Home) सवलत द्यावी. ज्या कंपन्या किंवा आस्थापना या आदेशाचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा थेट इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आहे. तसेच नागरिकांनी अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनांना आणि आपत्कालीन यंत्रणांना 24 बाय 7 अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या 24 तासांत राज्याच्या अनेक भागांत भूस्खलनाच्या (Landslide) दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरही (Mumbai Pune Expressway) मोठ्या प्रमाणावर दरड कोसळून माती आणि मोठमोठे दगड रस्त्यावर आले आहेत. या ठिकाणी वाहतूक पूर्ववत करण्यासाठी संबंधित यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असून, वाहतूक कोंडी सोडवण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
मुंबईसह किनारी भागातील जिल्ह्यांमध्ये ताशी 50 ते 70 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. समुद्रात येणाऱ्या हायटाईडचा (High Tide) धोका लक्षात घेता NDRF आणि SDRF यांच्या पथकांना संवेदनशील भागात तैनात करण्यात आले आहे.
बैठकीत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसराबाबत मोठी चिंता व्यक्त केली. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे नाशिक जिल्ह्यात मंगळवारी तब्बल 300 मिलिमीटरहून अधिक म्हणजे ढगफुटीसदृश पाऊस होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा पाऊस प्रामुख्याने त्र्यंबकेश्वर आणि आजूबाजूच्या डोंगराळ परिसरात कोसळू शकतो.
या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा प्रशासनाने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरडी कोसळण्याची ठिकाणे आणि बंद होऊ शकणारे रस्ते ओळखून पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच पुढील काही दिवस पर्यटकांनी त्र्यंबकेश्वर आणि नाशिक परिसरातील पर्यटन स्थळांवर जाणे पूर्णपणे टाळावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाच्या वतीने केले आहे.
ही बातमी वाचा: