Mumbai Mankhurd News : राज्यभरासह मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाचा रौद्रावतार बघायला मिळत आहे. अशातच मुंबईतील मानखुर्द (Mankhurd) भागात एका तीन मजली चाळीचा भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. धोकादायक असलेली ही चाळ रिकामी करण्यासाठी घरातील सामान आवरत असतानाच अचानक पावसाने घात केला आणि संपूर्ण घर कोसळले. या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्यामुळे 5 निष्पाप लहान मुले आणि एका महिलेसह 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. मानखुर्द पोलीस ठाण्यात गु.र.क्र. 425/2026 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
5 जुलै रोजी रात्री सुमारे 8.30 वाजता जनता नगर, न्यू मंडाळा, मानखुर्द येथे इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आवश्यक सुरक्षिततेचे नियम न पाळता अनधिकृत चार मजली इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. इमारत काही दिवसांपासून धोकादायक अवस्थेत असल्याची माहिती असूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. शेजारील झोपडीमध्येही आवश्यक सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या. ही इमारत कोसळून शेजारील झोपडीवर पडल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आहे. इमारतीचे मालक, बांधकामाशी संबंधित कंत्राटदार, झोपडी मालक तसेच अनधिकृत बांधकामास प्रोत्साहन देणाऱ्या संबंधित खाजगी व शासकीय व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. पुढील तपास मानखुर्द पोलीस करत आहेत.
मुंबईतील मानखुर्द भागात जनता नगर परिसरात काल, रविवार (5 जुलै 2026) रोजी रात्री साडे आठच्या सुमारास अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली. जनता नगर परिसरात असलेल्या तीन मजली कच्च्या चाळीतील २ ते ३ घरे अचानक कोसळली. या दुर्घटनेत ५ लहान मुले आणि एक स्त्री अशा एकूण ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी गोवंडी स्थित पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयात जावून मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन करून धीर दिला. यावेळी आमदार अबू आझमी, रुक्साना सिद्दिकी हेही उपस्थित होते.
प्रथमदर्शनी प्राप्त माहितीनुसार, रविवारी रात्री साधारण साडेआठ वाजेच्या सुमारास मानखुर्द मध्ये हनुमान मंदिराजवळील, जनता नगर मधील चाळ क्रमांक 5 मधील तळमजला अधिक तीन मजले असलेल्या 2 ते 3 झोपड्या/ कच्ची घरे कोसळली. त्याच्या ढिगाऱ्याखाली रहिवासी अडकले. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलीस, महानगरपालिकेचे विभाग कार्यालयातील कर्मचारी आणि 108 रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले आणि तातडीने जवळच्या रुग्णालयांमध्ये रवाना करण्यात आले. यावेळी स्थानिक नगरसेवक नवनाथ बन हे स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून बचावकार्याचे समन्वयन करीत आहेत. या दुर्घटनेतील बाधितांना गोवंडी स्थित पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालय आणि घाटकोपर स्थित राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.