पुण्यात मागील 24 तासांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. पुण्यातील शहर आणि ग्रामीण भागात पाऊस जोरदार हजेरी लावताना दिसत आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवनही विस्कळीत झालंय. तर या पावसामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. धरणसाठ्यात वेगाने वाढ होऊ लागल्याने धरण परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सावध राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत सध्या एकूण 10.67 टीएमसी पाणीसाठा असल्याची माहिती हाती आली आहे. यातील खडकवासला धरणात 1.24 टीएमसी, पानशेत 4.20 टीएमसी, वरसगाव धरणात 4.62 टीएमसी, टेमघर धरण 0.62 टीएमसी पाणीसाठा जमा झाल्याची माहिती हाती आलीये. त्यामुळे एकत्रित धरणाचा पाणीसाठा जलाशयांच्या एकत्रित क्षमतेच्या 36.६३ इतका झालाय.
खडकवासला धरणसाखळीत या दिवशी 19.08 टीएमसी इतका पाणीसाठा होता. एकंदरीत धरणसाखळीत 65.46 इतके पाणी होते. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा कमी असल्याचे समोर आलं आहे. हा साठा जवळपास 8 टीएमसी कमी पाणी धरणांत साठलंय. मागील 7 दिवसांत धरणसाठ्यात जलसाठा वाढला असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून येत आहे.
खडकवासला धरण किती टक्के भरले?
खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे 7 जुलै 2026 रोजी पहाटे 4 वाजेपर्यंत धरणात 62 टक्के इतका पाणीसाठा झालाय, अशी माहिती प्रशासनाने दिली. धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाचा वेग कायम राहिल्यास पुढील काही तासांत धरण 80 टक्के किंवा अधिक पाणी भरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
🚨सावधानतेचा इशारा#खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्यन्यवृष्टी होत असून धरण जलाशय आज (७ जुलै)पहाटे ४ वाजता ६२ टक्के क्षमतेने भरले आहे. धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता येत्या काही तासांत धरण ८० टक्के अथवा त्याहून अधिक क्षमतेने भरण्याची शक्यता आहे ..१/२#rainupdate
— DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@InfoDivPune) July 7, 2026
प्रशासनाचं नागरिकांना मोठं आवाहन
प्रशासनाने पुढे स्पष्ट केलं की, मुसळधार पावसामुळे कधीही धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. तसेच नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, असं पाटबंधारे विभागाने आवाहन केलं आहे.