Nashik Rain Update : ढगफुटी 300 मिमी पावसाची भिती असतानाच नाशिकमध्ये पावसामुळे घडली एक सकारात्मक गोष्ट
Tv9 Marathi July 07, 2026 01:45 PM

साधारणत: जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रात सक्रीय होतो. पण यंदा जून महिन्याचे पहिले तीन आठवडे पावसाने ओढ दिली होती. एकाबाजूला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा आटत चाललेला. दुसरीकडे दुष्काळाच्या भितीने बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले होते. पण जून महिन्याच्या 27-28 तारखेपासून पावसाने चांगला जोर पकडला. जुलै महिन्याच्या 1 तारखेपासून पावसाने जोरदार बॅटिंग सुरु केली. मागच्या दोन-तीन दिवसात महाराष्ट्राच्या अनेक भागात पावसाची मुसळधार सुरु आहे. दोन दिवसात झालेल्या जोरदार पावसाने पुण्या-मुंबई सारख्या महानगरांना अस्ताव्यस्त करुन टाकलं. या दोन्ही शहरांच्या वाहतुकीचा वेग मंदावला. रेल्वे रुळ, रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. आता मुंबई, पुण्यानंतर नाशिकमध्ये मुसळधार वृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

नाशिकमध्ये आज ढगफुटी सदृश्य जवळपास 300 मिमी पाऊस होईल असा अंदाज आहे. नाशिकसाठी आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिकसाठी प्रशासनाने खबरदारी म्हणून अनेक पावलं उचलली आहेत. नाशिकमध्ये शाळा-कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नाशिक शहरात आज सकाळपर्यंत 60 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. रात्रीपासूनच त्रंबकेश्वर आणि परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. आज नाशिकमध्ये आपत्ती उदभवेल असा पाऊस बरसेल असा अंदाज आहे. हवामान विभागाने तसा इशारा दिला आहे. पण या दरम्यान एक सकारात्मक बातमी सुद्धा आहे.

नाशिकमध्ये पावसामुळे घडली एक सकारात्मक गोष्ट

सतत सरु असलेल्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा एकाच दिवसात सात टक्क्यांनी वाढला आहे. नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाचा हा सकारात्मक परिणाम आहे. जून महिना उलटून गेल्यानंतरही नाशिककडे पावसाने पाठ फिरवली होती. पण आता वरुणराजाची नाशिकवर कृपा झाली आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण 67.74% भरले आहे. सध्या गौतमी गोदावरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पावसाचा जोर कायम असल्याने प्रशासन सतर्क आहे. चिंता, संकट, आपत्तीची भिती या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये धरणातील पाणीसाठ्यात वाढ होणं ही एक चांगली बाब आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.