मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभांचा धडाका सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते अजित पवार हे आज मुंबईत (Mumbai) सभा घेत आहेत. अणुशक्ती नगर-शिवाजीनगर आणि गोवंडी विधानसभा मतदारसंघांमध्ये नवाब मलिक आणि त्यांची मुलगी सना मलिक यांच्यासाठी अजित पवार मानखुर्द लल्लुभाई पार्कमधून रोड शो करून प्रचार करणार आहेत. त्यामुळे, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष येथील मतदारसंघात पाहायला मिळत आहे. दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने हक्क मागतोय महाराष्ट्र हे जाहिरात कॅम्पेन रावबत सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे. महाविकास आघाडीच्या एका जाहिरातीमधून उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit pawar) लक्ष्य करत त्यांचे पात्र दाखवण्यात आलं आहे. आता, या जाहिरातीविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
महाविकास आघाडीच्या जाहिरातीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून जाहिरातीमधील मजूकर आणि अजित पवारांच्या पात्राचा उल्लेख करत तक्रार दाखल केली आहे. या जाहिरातीच्या माध्यमातून अजित पवारांची प्रतिमा मलिन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न महाविकास आघाडीच्यावतीने केला जात असल्याचंही त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे. बदनामीकारण मजकूर, खोट वृत्त आणि वादग्रस्त आशयाची व्हिडिओ जाहिरात बनवून अजित पवारांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं सूरज चव्हाण यांनी तक्रारीत म्हटलं आहे. या तक्रारीची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही पत्रातून करण्यात आली आहे.
दरम्यान, या जाहिरातीमध्ये एका महिला भगिनीशी बोलताना अजित पवार हे महिन्याला तुम्हाला दीड हजार रुपये दिले ना असं सांगताना दिसून येतात. मात्र, ह्या दीड हजारांचा दादा तुमचा वाद फसवा असल्याचं ती महिला म्हणते. गुलाबी जॅकेट आणि ढोकळा खाताना अजित पवारांचे पात्र जाहिरातीमध्ये साकारण्यात आल्याचं दिसून येत आहे. महागाई वाढल्याने महाराष्ट्र त्रस्त असून तुम्ही तुमच्या सत्तेत मस्त असल्याचंही जाहिरातीमधील महिला अजित पवारांचे पात्र साकारलेल्या व्यक्तीला बोलताना दिसून येते. सध्या, सोशल मीडियावर ही जाहिरात चांगलीच व्हायरल झाला आहे. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. 1500 रुपयांत काही होत नाही, कारण महिन्याचा खर्च 15 हजारांवर गेलाय, खोटा दादा, फसवा वादा.. असेही जाहिरातीमधून म्हटले आहे.