बटेंगे तो कटेंगे महाराष्ट्राला पटणारं नाही, भाजपकडून जाणीवपूर्वक जाती धर्मांमध्ये विष पेरण्याचं पाप; विश्वजित कदमांची घणाघाती टीका
कुलदीप माने, एबीपी माझा November 16, 2024 11:13 AM

Vishwajeet Kadam On BJP Statement: राज्यात विधानसभा निवडणुकांची (Vidhan Sabha Election 2024) चुरस रंगल्याचं पाहायला मिळतेय. अशातच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून 'बटेंगे तो कटेंगे'चा (Batenga Tho Katenge) नारा देण्यात येत आहे. पण, भाजपचा हा नारा अनेकांना पटलेला नाही. विरोधी पक्षानं भाजपच्या याच वक्तव्याचा निषेध करत अनेकांना खडे बोल सुनावले आहेत. तर, सांगलीतून काँग्रेस नेते विश्वजित कदमांनीही (Vishwajeet Kadam) भाजपच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. 'बटेंगे तो कटेंगे' वरुन काँग्रेसच्या विश्वजित कदमांनी भाजपवर (BJP) टीकास्त्र डागलं आहे. बटेंगे तो कटेंगे भाजपची ही बडबड जनतेला पटणारी नाही, असंही ते म्हणाले आहेत. 

काँग्रेस नेते विश्वजित कदम बोलताना म्हणाले की, 'बटेंगे तो कटेंगे' हे महाराष्ट्राला पटणारं नाही, भाजपकडून जाणीवपूर्वक जाती-धर्मांमध्ये विष पेरण्याचं पाप केलं जातंय, असा आरोप काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी केला आहे. महिलांना पंधराशे रुपये देऊन आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय, अशी सडकून टिकाही विश्वजीत कदमांनी लाडकी बहीण योजनेवरुन सरकारवर केली आहे. 

भाजपकडून 'बटेंगे तो कटेंगे' ही जी काय बडबड सुरू केली आहे, ही त्यांना शोभणारी नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेलाही पटणारी नाही. भाजपनं निवडणुकीमधील हे प्रकार बंद करावेत. भाजपकडून लाचारीमध्ये हे असले काहीतरी प्रयोग केले जात आहेत आणि जाणीवपूर्वक जाती-जातींमध्ये जाती-धर्मांमध्ये विष पेरण्याचं पाप हे भाजपावले करतात, असा आरोप काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी केला आहे. आज लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून  महिलांना पंधराशे रुपये देऊन आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. महिलांना  आज या लाडक्या बहिणींपेक्षा त्या ठिकाणी सक्षम होईल आणि ताकदीची बहिणी हे करणं गरजेचं आहे, असंही विश्वजित कदम म्हणाले आहेत.

पलूस कडेगाव मतदारसंघात चुरस 

सांगलीतील पलूस कडेगाव मतदारसंघात पारंपरिक विरोधी गट असलेल्या कदम-देशमुख गटात लढत रंगल्याचं यंदाच्या विधानसभेच्या रिंगणात पाहायला मिळणार आहे. काँग्रेसकडून विद्यमान आमदार डॉ. विश्वजित कदम आणि भाजपकडून संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी मिळाली आहे. कदम-देशमुख गटातील हे दोन तरुण नेते प्रथमच विधानसभेच्या निवडणुकीत आमने-सामने येत आहेत. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर  झालेल्या पोटनिवडणुकीत विश्वजित कदम प्रथमच आमदार बनले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पलूस कडेगावची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली आणि या निवडणुकीत देखील काँग्रेसचे विश्वजित कदम विक्रमी मतांनी निवडून आले. यंदा मात्र हा मतदारसंघ भाजपकडे गेल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेले संग्रामसिह देशमुख हे महायुतीचे उमेदवार आहेत. यामुळे सुरूवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक आता रंगतदार होण्याची शक्यता आहे.  

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.