Shirdi Sai Baba Temple: नाताळ, चालू वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त साईबाबा संस्थानाच्या वतीनं शिर्डी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता, शिर्डी मंदीर ३१ डिसेंबरला दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे. याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिली आहे.
'दरवर्षी नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. येणार्या सर्व भाविकांना साईबाबांच्या समाधीचे दर्शन मिळावे, तसेच गर्दीचे नियोजन योग्य रीतीने व्हावे या उद्देशाने दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे'. याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिली आहे.
यादरम्यान ३१ डिसेंबर रोजीची शेजारती आणि १ जानेवारीची ( २०२५) पहाटेची काकड आरती होणार नाही. तसंच नाताळ आणि नवर्षाच्या सुट्टीच्या गर्दीमुळे २५ डिसेंबर त १ जानेवारी असे ७ दिवस वाहन पुजा बंद राहणार आहे. पण नाताळ सुट्टीच्या कालावधीत श्री साईसत्यव्रत पूजा, अभिषेक पूजा सुरू राहील. मुख्य म्हणजे मंदिर आणि परिसरात फटाके आणि वाद्य वाजविण्यास मनाई करण्यात आलं असल्याचंही कोळेकर यांनी सांगितलं. सुरक्षिततेच्या दृष्टीनं या नियमांचे पालन करावे असे आवाहन कोळेकर यांनी केलंय.
हा महोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर, संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्व प्रशासकीय अधिकारी तसंच सर्व विभागांचे विभाग प्रमुख आणि सर्व कर्मचारी प्रयत्नशिल असतील. सुट्ट्यांच्या काळात संभाव्य गर्दी लक्षात घेता भाविकांचे दर्शन सुकर व्हावे, यासाठी साई संस्था विविध उपाययोजना राबवत आहे. त्यामुळे भाविकांना ३१ डिसेंबरला रात्रीही दर्शन घेता येणार आहे.