सध्या फेक न्यूज व्हायरल करण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशीच एक पोस्ट समोर आली आहे. या पोस्टमध्ये सकाळ समुहाच्या वॉलचा वापर करून फेक न्यूज पसरवण्यात आली आहे. यामुळे लोकांची दिशाभूल केली जात आहे. मात्र ही व्हायरल पोस्ट सकाळ समुहाने केली नाही. सकाळच्या एका पोस्टला एडिट करून ही पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे. त्यामुळे त्यावर कुणीही विश्वास न ठेवण्याचे आवाहन सकाळ समूह करत आहे.
नेमकं काय व्हायरल होत आहे?सकाळच्या नावाने एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात लिहिलयं की, साध्या कंडोमवर ५ टक्के आणि थीन कंडोमवर १८ टक्के जीएसटी लावण्यात येणार आहे. क्रोनोलॉजी समजा. जितकी जास्त मजा, तेवढी जास्त जीएसटी द्यावी लागेल, अशी पोस्ट व्हायरल होत आहे. मात्र या पोस्टमधून मजकूर हा सकाळने दिलेला नाही. ही पोस्ट एडीट करून व्हायरल करण्यात आली आहे.
तपासणीत काय समोर आले?व्हायरल पोस्टमधील वापरलेला मजकूर खोटा आहे. तसेच मजकूर लिहिण्यासाठी वापरलेला फॉंटही सकाळचा नाही. ही पोस्ट एडिट केलेली दिसत आहे. यामुळे आता या पोस्टवर कुणी विश्वास ठेऊ नका, असं आवाहन सकाळ करत आहे.
सत्य काय?सकाळचा लोगो वापरून हे 'सोशल मीडिया कार्ड' सकाळ माध्यमांकडून प्रसिद्ध करण्यात आलेले नाही.
पुरावा १या संदर्भात सकाळ समुहाच्या ‘सोशल मीडिया टीम लीड’ समृद्धा भांबुरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, आमच्या प्रत्येक 'सोशल मीडिया कार्ड' कार्डची आमच्याकडे नोंद राहते. सकाळचा लोगो वापरून ही पोस्ट सकाळ माध्यमाकडूनच केली आहे असे भासविण्याचा प्रयत्न केला असला तरीही ही व्हायरल होत असलेली पोस्ट सकाळ समूहाकडून केली नाही.
पुरावा २व्हायरल होत असलेली पोस्ट आणि सकाळ माध्यमांकडून तयार करण्यात येणारे क्रिएटिव्ह आम्ही तपासले असता यामध्ये डिजाईन, फॉन्ट आणि अलाइनमेंट या तीनही गोष्टीत फरक आढळून आला आहे. यामुळे ती फेक असल्याचे दिसत आहे. याविरोधात सकाळ समुह कठोर भूमिका घेणार आहे. याबाबत रितसर तक्रार करण्यात येणार आहे.
निष्कर्ष :ही व्हायरल पोस्ट फेक न्यूज असल्याचे तपासात समोर आले आहे. कुणीतरी खोडसाळपणे सकाळ समुहाची प्रतिमा मलीन करण्याच्या प्रयत्नात ही पोस्ट व्हायरल केली आहे.