जयपूरमध्ये एलपीजी आणि सीएनजी टँकरची धडक होऊन झालेल्या भीषण अग्नितांडवात आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी आणखी दोघांची प्राणज्योत मालवली. अधिकाऱ्यांनी मृतांचा आकडा १७ वर पोहोचल्याचं सांगितलं. अद्याप या अग्नितांडवात होरपळलेल्या १६ जणांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समजते.
सरकारी एसएमएस रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर सुशील भाटी यांनी सांगितलं की, बुधवारी पहाटे एक पुरुष आणि एका महिलेचा मृत्यू झाला. या दोघांच्या मृत्यूमुळे मृतांचा आकडा १७ वर पोहोचला आहे. तर रुग्णालयात उपचार सुरू असलेल्यांपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.
जयपूरच्या भांकरोटा परिसरात शुक्रवारी पहाटे जयपूर अजमेर महामार्गावर एका ट्रकने एलपीजी भरलेल्या टँकरला धडक दिली. या भीषण अपघातानंतर टँकरला आग लागली. यात ३५ पेक्षा जास्त वाहनं जळून खाक झाली होती. घटना घडली त्यादिवशी ११ जणांचा मृत्यू झाला होता. आता मृतांची संख्या वाढून १७ वर पोहोचली आहे.