Til price : यंदा नात्यातील गोडवा महागला, तिळाचे भाव १८० ते २०० रुपये किलो
esakal December 26, 2024 10:45 PM

कळंब : आपल्या जवळच्या माणसांच्या नात्यातील गोडवा कायम राहावा, याचा आग्रह सर्वच धरतात. नात्यातील गोडवा वृद्धिंगत करण्यासाठी मकरसंक्रांत हा सण सर्वात महत्त्वाची भूमिका बजावत असतो. यंदा नात्यातील गोडवा महाग झाला आहे. तिळाच्या वाढत्या भावाचे. गतवर्षीपेक्षा यंदा तिळाचे भाव १८० ते २०० रुपये किलो मागे आहेत.

मकरसंक्रात अवघ्या २० दिवसांवर आली आहे. यानिमित्त तीळ आणि गुळाला अधिक महत्त्व दिले जाते. प्रत्येक घरी एकमेकांना तिळगुळ घ्या...गोड गोड बोला म्हणत तिळगुळ वाटण्याची परंपरा आहे. यंदा सण साजरा करण्यासाठी तीळ बाजारात विक्रीसाठी आले आहेत.

परंतु, नात्यातील गोडवा वाढविणाऱ्या या सणाला महागाईची झळ लागली आहे. गेल्या वर्षी तीळ १५० ते १६० रुपये किलो दराने मिळत होते. यंदा तिळाच्या दरात तब्बल ४० रुपये किलो दरवाढ झाली आहे. या वार्षिक भाव वाढीसह संक्रांत सण तोंडावर आलेला असताना तिळाचा दर अजून १० ते १५ रुपयांची वाढ झाल्याचे किराणा विक्रेते सांगतात.

गूळही ५० रुपये किलो

सर्रास शेतकरी स्वतः पुरते पुरेल इतकच तिळाचे उत्पादन घेतात. तीळ पेरणी आणि काढणी त्यातून भरघोस उत्पन्न मिळेल याची शाश्वती नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात तिळाचे उत्पन्न घेण्यास टाळाटाळ करतात. मागील दोन महिन्यांपासून तिळाचे दर २२० रूपये प्रति किलो होते. यंदा १८० ते २०० रुपये किलो दराने विक्री होत आहे. त्याचबरोबरच तिळासोबत लागणारा गूळही ५० रुपये किलो दराने विक्री होत आहे. तिळासाठी लागणारा हलवा ही महागला आहे.

दर वाढले तरी मागणी वाढलेलीच

एकीकडे तिळाचे दर वाढलेले असतानाही तीळ व गुळाची खरेदी होताना दिसत आहे. संक्रांत सणानिमित्त महिलांची सध्या बाजारपेठेत गर्दी होत आहे. किराणा दुकानासह खुल्या पद्धतीने रस्त्यावर बसलेल्या तीळ व गूळ विक्रेत्यांकडेही महिलांची गर्दी दिसत आहे. दर वाढलेले असले तरी तीळ व गूळ खरेदीवर कोणताही परिणाम दिसून येत नाही.

शक्यतो बहुभुधारक असलेले शेतकरी तिळाचे उत्पन्न घेतात. त्यांना वर्षभर पुरेल तेवढ तिळाच्या उत्पांनाकडे लक्ष दिले जाते. या पिकाला रोगराई नसली तरी तिळाचे उत्पन्न घेण्याकडे शेतकरी दुर्लक्ष करतात. इतर राज्य तिळाचे उत्पन्न घेण्यास आघाडीवर आहेत. त्यामुळे बाहेर राज्यातील तीळ बाजारात असल्याचे दिसते. बाजारात आवक कमी व मागणी वाढल्यामुळे तिळाच्या दरात वाढ झाली आहे. महाराष्ट्रात मध्य प्रदेश, गुजरात, तामिळनाडू आदी राज्यातून तिळाची आवक होते.

— अजीम शेख, किराणा दुकानदार, कळंब.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.