रेणापूर : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील संशयितांना तत्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी शुक्रवारी रेणापूर तहसील कार्यालयावर आक्रोश महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चात दिवंगत संतोष देशमुख यांची कन्या वैभवी व मुलगा विराज सहभागी झाले होते.
रेणापूर शहर व तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवारी (ता.२७) काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चाचा प्रारंभ श्रीराम विद्यालयापासून झाला. या मोर्चामध्ये प्रत्येक गावांतून समाजबांधव, युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मुख्य रस्त्याने हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला.
तहसीलदार मंजूषा भगत यांना विविध मागण्यांचे निवेदन वैभवी व विराज यांच्या हस्ते देण्यात आले. वंचित बहुजन आघाडी, एमआयएम यांनी मोर्चाला पाठिंबा देत सहभाग नोंदविला. यावेळी संभाजी सेनेचे अध्यक्ष सुधाकर माने यांनी, समाजाच्या मागण्या मान्य न केल्यास ता.एक जानेवारीला रेणापूर पिंपळफाटा येथे रस्तारोको व चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला.
उपस्थितांना अश्रू अनावररेणापूर तालुक्यातील वाला येथे आजोळ असलेल्या वैभवी देशमुख हिने आक्रोश मोर्चानिमित्त उपस्थितांशी संवाद साधला. संतोष देशमुख यांच्या कार्याचा आढावा घेताना वैभवीने आमचे वडील आमच्यातून निघून गेले आहेत. आमच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर उभा राहिला आहे. अशी वेळ कुणावरही येऊ नये, तुम्ही आमच्या परिवाराचा हिस्सा बना, आम्हांला न्याय मिळवून देण्यासाठी आमचे कुटुंब म्हणून साथ द्या, अशी भावनिक हाक तिने दिली.यावेळी तिला ऐकताना मोर्चातील महिला व पुरुषांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते.
आंदोलकांनी केलेल्या प्रमुख मागण्या
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित व सूत्रधाराला तात्काळ अटक करावी
खटला जलद गती न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी
देशमुख यांच्या कुटुंबीयांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांना पोलिस संरक्षण द्यावे
देशमुख कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे
हत्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ व विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करत सहआरोपी करावे
परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी
माझ्या वडिलांनी अनेक विधायक कामे केली, सतत समाजाच्या कल्याणासाठी ते कार्य करत राहिले. विकासकामांतून मस्साजोग ग्रामपंचायतीला त्यांनी अनेक पुरस्कार मिळवून दिले. काहीही दोष नसताना त्यांची क्रूर हत्या केली गेली, आमच्या डोक्यावरचे छत्र हिरावून घेतले गेले. सर्व मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा, आम्हांला आता न्याय मिळवून द्या.
—वैभवी संतोष देशमुख, मस्साजोग