Santosh Deshmukh Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात CID ला मोठं यश, पुरावा सापडला
Saam TV December 29, 2024 08:45 PM

बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीला मोठं यश आले आहे. सीआयडीच्या हाती मोठा पुरावा लागला आहे. गुन्ह्यात वापरलेल्या स्कार्पिओ गाडीत सीआयडीला दोन मोबाईल्स फोन सापडले आहेत. या फोनमध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडीओ शूट करण्यात आला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सीआयडीकडून सध्या याप्रकरणाचा कसून तपास सुरू आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अपहरणादरम्यान वापरण्यात आलेली ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ कार पोलिसांनी दुसऱ्या दिवशी जप्त केली होती. याच स्कॉर्पिओ कारमध्ये सीआयडी पथकाला दोन मोबाईल्स आढळून आले आहेत. या मोबाईलमध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ चित्रित करण्यात आला होता. तर याच मोबाईलवरून एका बड्या नेत्याला फोन देखील केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

मागील चार दिवसांपासून सीआयडीचे पथक बीडमध्ये तळ ठोकून आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सीआयडी करत असून सीआयडीचे विशेष पथक बीड शहर पोलिस ठाण्यामध्ये दाखल आहे. या माहितीच्या आधारे सीआयडीचा सध्या तपास सुरू आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग झाल्यानंतर तपासाला गती आली आहे. या हत्या प्रकरणाशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी सीआयडीकडून दररोज चौकशी केली जात असून आतापर्यंत १०० हून अधिक जणांकडून या प्रकरणाविषयी काही माहिती मिळते का? याबाबत चाचणी करण्यात येत आहे.

आजसुद्धा सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी बीडमध्ये तळ ठोकून असून आज ६ जणांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील ३ आरोपी अद्याप फरार असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी सीआयडीचे अधिकारी जोरदार प्रयत्न करताना दिसत आहेत. आता सीआयडीच्या हाती २ मोबाईल्स लागले आहेत. त्यामुळे यातून नेमकं काय माहिती समोर येते ते पाहणं महत्वाचे ठरेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.