टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याला गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने मोठी खेळी करण्यात अपयश येत आहे. रोहितने अवघ्या काही महिन्यांपूर्वी त्याच्या नेतृत्वात भारताला 11 वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकून दिली. रोहितने भारताला 2007 नंतर आयसीसी टी20i वर्ल्ड कप जिंकून दिला. मात्र त्यानंतर ते आतापर्यंत झालेल्या कसोटी मालिकांमध्ये रोहितला त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. न्यूझीलंड विरुद्ध मायदेशात झालेली कसोटी मालिका आणि त्यानंतर आता बॉर्डर गावसकर ट्रॉफीत रोहित सपशेल अपयशी ठरला आहे. रोहितच्या अशा कामगिरीमुळे तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याचं म्हटलं जात आहे. रोहितने अशातच सोशल मीडियावर पोस्ट केली आहे, ज्यामुळे एकच चर्चा रंगली आहे.
रोहितने 2024 या वर्षातील शेवटच्या दिवशी एक अविस्मरणीय असा व्हीडिओ पोस्ट केला आहे. रोहितच्या या व्हीडिओवर क्रिकेट आणि हिटमॅन चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादव यानेही या व्हीडिओवर ‘लव्ह’ रिएक्ट केलं आहे.
कॅप्टन रोहित, टीम इंडिया आणि भारतासाठी 2024 हे केव्हाही न विसरता येणारं वर्ष ठरलं. रोहितने 17 वर्षांनंतर भारताला टी 20i वर्ल्ड कप जिंकून दिला. भारताची यासह गेल्या 13 वर्षांपासूनची आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची प्रतिक्षा संपली. मात्र त्यानंतर टीम इंडियाने कसोटी मालिकेतून क्रिकेट चाहत्यांची निराशा केली. न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात 0-3 ने व्हाईटवॉश स्वीकारावा लागला. तर 5 सामन्यांच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीत टीम इंडिया 1-2 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियाची सलग तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहचण्याची शक्यता फार कमी झाली आहे. त्यामुळे रोहितच्या बॅटिंगसह कॅप्टन्सीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
रोहितने व्हीडिओद्वारे 2024 मधील असंख्य आठवणींना उजाळा दिला आहे. रोहितसह या व्हीडिओत टीम इंडियाचे सर्व खेळाडू पाहायला मिळत आहेत. रोहितने या व्हीडिओद्वारे टी 20 वर्ल्ड कप विजयावर लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. “सर्व चढ-उतारांसह आणि दरम्यानच्या प्रत्येक गोष्टीसाठी 2024 या वर्षाला धन्यवाद”, रोहितने असं कॅप्शन या व्हीडिओला दिलं आहे.
दरम्यान बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पाचवा आणि अंतिम सामना हा 3 जानेवारीपासून सिडनी येथे खेळवण्यात येणार आहे. कॅप्टन रोहित या सामन्यानंतर निवृत्त होणार असल्याची चर्चा रंगली आहे.