ऑस्ट्रेलियात जसप्रीत बुमराहचा बोलबाला पाहायला मिळत आहे. चार सामन्यात जसप्रीत बुमराहने 12.83 च्या सरासरीने 30 विकेट घेतल्या आहेत. यात तीन वेळा पाच विकेट घेण्याचा मान मिळवला आहे. बुमराहच्या गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियन फलंदाजांची त्रेधातिरपीट उडाली आहे. पण दुसऱ्या बाजूला इतर गोलंदाज मात्र निष्फळ ठरले आहेत. त्यामुळे सिडनी कसोटीतही बुमराहच्या गोलंदाजीवर भारताची मदार असणार आहे यात काही शंका नाही. असं असताना पाचव्या कसोटी सामन्यात बुमराह दुहेरी भूमिका बजावताना दिसणार आहे. कारण पाचव्या कसोटीत रोहित शर्माला आराम दिला जाणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. त्यामुळे कर्णधारपदाची धुरा जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर असणार आहे. पर्थ कसोटीत बुमराहने कर्णधारपद भूषवलं होतं. तेव्हा टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी दारूण पराभव केला होता. त्यामुळे पाचव्या कसोटीत त्याच्या नेतृत्वात अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. असं असताना बुमराहच्या गोलंदाजीने ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधानही प्रभावित झाले आहेत.
सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान बुमराहच्या गोलंदाजीने प्रभावित झाल्याचं सांगितलं आहे. त्यांनी यावेळी सांगितलं की, ‘आम्ही इथे एक कायदा पास करू शकतो. या कायद्यानुसार जसप्रीतला डाव्या हाताने गोलंदाजी किंवा एक पाउल टाकत गोलंदाजी करावी लागेल. प्रत्येकवेळी जेव्हा गोलंदाजी करण्यासाठी आला तेव्हाचं चित्र रोमांचक असल्याचं दिसून आलं आहे.’ 1 जानेवारीला रोहित शर्मा आणि इतर सर्व खेळाडू पंतप्रधान अँथोनी अल्बानीज यांच्या निवासस्थानी गेले होते. यावेळी ऑस्ट्रेलियन संघ आणि दिग्गज माजी क्रिकेटपटू ग्लेन मॅक्ग्राथही होता. यावेळी अल्बानीज यांनी बुमराहच्या गोलंदाजीचं कौतुक केलं.
पाचवा कसोटी सामना टीम इंडियासाठी खूपच महत्वाचा आहे. कसोटी मालिका वाचण्यासोबत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीसाठी शेवटची आस आहे. त्यामुळे हा सामना भारतासाठी करो या मरोची लढाई आहे. या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये बदल होणार हे निश्चित आहे. रोहित शर्माऐवजी शुबमन गिल संघात येईल. तसेच आकाशदीपला आराम देऊन प्रसिद्ध कृष्णाला संधी मिळण्याची शक्यता आहे.