Sonu Sood : बॉलिवूडचा परोपकारी अभिनेता सोनू सूद याने आज सहपरिवार साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला हजेरी लावत दर्शन घेतले.. सोनू याचा फतेह हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून चित्रपटाच्या यशस्वीतेसाठी सोनू सूद याने साईचरणी प्रार्थना केली आहे.. फतेह चित्रपटातून मिळणारा नफा अनाथ आश्रम आणि वृध्दाश्रमासाठी मदत देणार असल्याचे सोनू याने सांगितले.
अभिनेता हा निस्सीम साईभक्त असून तो गेल्या 22 वर्षांपासून त साई दर्शनाला येत असतो. आज नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर तसेच आगामी चित्रपटाच्या यशासाठी सोनू सूद शिर्डीत साई दरबारी आला होता.. मध्यान्ह आरतीला हजेरी लावत त्याने आगामी 10 जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या फतेह चित्रपटाच्या यशस्वीतेसाठी प्रार्थना केली.
यावेळी सोनू याने फतेह नाव लिहिलेला काळ्या रंगाचा टी शर्ट देखील परिधान केलेला होता. माझ्या करिअरची सुरुवात साईबाबांच्या दर्शनाने झाली होती त्यामुळे मी नेहमी साई दर्शनाला येतो. अनेक चित्रपट येतात जातात मात्र लोकांच्या मनात जागा बनवणे आणि त्यांचे आशीर्वाद मिळवणे अवघड असते.. साईबाबांच्या शिकवणीप्रमाणे मी गरजवंतांना मदत करत असतो. आज फतेह चित्रपटासाठी बाबांच्या चरणी प्रार्थना केली असून या चित्रपटाच्या माध्यमातून मिळणारा नफामधून अनाथ आश्रम आणि वृध्दाश्रमांसाठी मदत देणार असल्याचे यावेळी सोनू सूद याने माध्यमांशी बोलताना सांगितले.
शिर्डीला जाण्याआधी सोनू सूदने अमृतसरमधील गोल्डन टेम्पल येथे आणि उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिरालाही भेट दिली होती. जिथे त्यांनी 'फतेह' चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना केली. त्याच्या आध्यात्मिक प्रवासाचा उल्लेख करताना सोनू सूद म्हणाला, "जेव्हा मी 'फतेह' चित्रपट बनवला तेव्हा त्याची सुरुवात बाबा महाकालच्या दर्शनाने झाली होती आणि जेव्हा आम्ही १० जानेवारी रोजी चित्रपट प्रदर्शित करत आहोत, या चित्रपटाच्या प्रमोशनची सुरुवातही येथून करत आहोत. त्यांच्या आशीर्वादाने आमचा चित्रपट यशस्वी व्हावा अशी मी प्रार्थना करतो."