सचिन गाड, साम प्रतिनिधी
कल्याणची घटना ताजी असतानाच घाटकोपर पश्चिममध्ये चिमुकलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खेळण्याच्या बहाण्याने आरोपीनं चिमुकलीला घरी नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री ही घटना घडली असून, ४ वर्षीय चिमुकलीवर लैगिंक अत्याचार झाल्यानं परिसरातील नागरीकांनी रोष व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करत अटक केली आहे.
वर्षाचा शेवट सर्वत्र जल्लोषात साजरा करण्यात आला. मात्र माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री शेजारच्या आरोपीनं चिमुकलीला घरी बोलावून घेतलं. चिमुकलीचं वय अवघे ४ वर्ष. घरी बोलावून घेऊन त्यानं तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
नेमकं घडलं काय?
३१ डिसेंबरची रात्र. प्रत्येक जण नव वर्षाच्या स्वागतासाठी उत्साही होते. मात्र घाटकोपरमध्ये धक्कादायक घटना घडली. शेजारी राहणाऱ्या नराधमानं ४ वर्षीय चिमुकलीला खेळण्याच्या बहाण्यानं घरी बोलावून घेतलं. नंतर तिच्यावर केला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर घाटकोपर पोलिसांनी २८ वर्षीय नराधमाला अटक केली आहे.
पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नंतर तपास करीत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४, ६४(२)(I) आणि ६५(२) सह बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याच्या (पॉक्सो) कलम ४, ८ आणि १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.