IND vs AUS : टीम इंडियाला पाचव्या कसोटीआधी झटका, संकटमोचक खेळाडू ‘आऊट’
GH News January 02, 2025 10:13 PM

ऑस्ट्रेलिया-इंडिया यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा सामना हा सिडनी येथे खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या हिशोबाने हा सामना जिंकणं बंधनकारक झालं आहे. त्यामुळे टीम इंडियासमोर विजय मिळवण्याचं आव्हान असणार आहे. मात्र टीम इंडियाला सामन्याआधीच मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू हा दुखापतीमुळे पाचव्या सामन्यातून बाहेर झाला आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आकाश दीप हा सिडनी टेस्टमधून बाहेर झाला आहे. टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर याने पत्रकार परिषदेदरम्यान ही माहिती दिली.

आकाश दीप याला पाठदुखीचा सामना करावा लागत आहे. आकाशला त्यामुळे पाचव्या सामन्याला मुकावं लागलं आहे. “आकाश दीपला पाठदुखीचा त्रास आहे. त्यामुळे तो बाहेर असणार आहे”, अशी माहिती गंभीरने दिली. आकाश दीपने तिसऱ्या कसोटी सामन्यात संकटमोचकाची भूमिका बजावली होती. सर्व फलंदाज अपयशी ठरल्यानंतर जसप्रीत बुमराह याच्यासह दहाव्या विकेटसाठी निर्णयाक भागीदारी करत आकाशने फॉलोऑन टाळला होता. आकाशने त्या डावात 31 धावांची चिवट खेळी केली होती.

आकाश दीपचा हा पहिलाच ऑस्ट्रेलिया दौरा आहे. आकाशला तिसऱ्या सामन्यात प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळाली होती. आकाशने 2 सामन्यांमध्ये 5 विकेट्स घेतल्या. आकाशने गाबात 3 तर मेलबर्नमध्ये 2 विकेट्स घेतल्या होत्या.

कुणाला संधी?

दरम्यान आता आकाश दीप याच्या जागी पाचव्या सामन्यात कुणाला संधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. टीम इंडियाच्या ताफ्यात प्रसिध कृष्णा आणि हर्षित राणा 2 वेगवान गोलंदाज आहेत. हर्षितला पहिल्या 2 सामन्यात संधी मिळाली होती. त्यामुळे प्रसिधला संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे.

पाचव्या टेस्टसाठी ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रेव्हिस हेड, ब्यू वेब्स्टर, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि स्कॉट बोलँड.

पाचव्या कसोटीसाठी टीम इंडिया : जसप्रीत बुमराह (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि वॉशिंगटन सुंदर.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.