बीड : गेल्या अनेक दिवसापासून बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच गाजत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मीक कराडला केज न्यायालयाने 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली असून बीड शहर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. मात्र, बुधवारी या पोलीस ठाण्यात अचानक पाच पलंग आणण्यात आल्याने वादाला तोंड फुटले आहे. याप्रकरणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Devendra Fadnavis responded to Valmik Karad VIP treatment)
राज्यात महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आज, गुरुवारी (02 जानेवारी) पहिली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाल्मीक कराड हा सरकारचा लाडका आरोपी आहे का? असा आरोप विरोधकांकडून होत आहे. यासंदर्भात प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, न पाहता केवळ प्रसिद्धीसाठी विरोधकांकडून काहीही बोललं जात आहे. विरोधकांना केवळ प्रसिद्धी हवी आहे. पोलिसांनी याप्रकरणी आधीच स्पष्ट सांगितलं आहे की, तपासासाठी बीडमध्ये अतिरिक्त पोलीस आले आहेत. त्यांना जमिनीवर झोपवायचं का? असा प्रश्न उपस्थित करत प्रसिद्धीची हाव असल्याने या प्रकरणावर कुणी काहीही बोलत आहे. कोणी एन्काउंटर होणार असल्याचेही म्हणत आहे, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केला.
– Advertisement –
हेही वाचा – Fadnavis about Lalu : नितीश कुमारांबद्दल लालूप्रसादांनी केलेल्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…
भाजपा आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले की, आमदार सुरेश धस यांनी मला निवेदन दिले आहे. यानंतर मी उज्ज्वल निकम यांना सरकारी वकील होण्याबाबत विनंती केली आहे. पण त्यांच्याकडे काही केसेस आहेत. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा त्यांना अभ्यास करावा लागेल. यासाठी त्यांनी एक दोन दिवसाचा वेळ मागितला आहे. मी त्यांना विनंती केली आहे, त्यामुळे त्यांनी होकार दिला तर त्यांची नियुक्ती करू, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
– Advertisement –