वाघोली - जुना वाद, मुलीशी मैत्रीचे संबंध. या कारणावरून बापाने दोन मुलांच्या मदतीने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा मारहाण व दगड डोक्यात घालून खून केल्याची घटना बुधवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास वाघोलीतील गोरे वस्ती परिसरात घडली. याप्रकरणी तिघांनाही अटक करण्यात आली आहे. सकाळी संतप्त नातेवाईकांनी आरोपीच्या घराची दगड फेक करून मोडतोड केली. पोलिसांनी वेळीच धाव घेत परिस्थिती नियंत्रणात ठेवली.
मुलाचे वडील वाघू मारुती धांडे (वय-64 वर्ष, रा. वाघोली) यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी नितीन पेटकर (वय-31 वर्ष), सुधीर पेटकर (वय-32 वर्ष), लक्ष्मण पेटकर (वय-60 वर्ष सर्व रा. वाघेश्वर नगर, गोरे वस्ती, वाघोली) अशी अटक केलेल्या बापलेकांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धांडे यांचा मुलगा व पेटकर यांची मुलगी यांच्यामध्ये मैत्रीचे नाते होते. ते पेटकर कुटुंबीयांना आवडत नव्हते. पेटकर व धांडे कुटुंबीय मध्ये पूर्वीचा वादही होता. बुधवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारे अल्पवयीन मुलगा हा दुचाकीवर गोरे वस्तीमध्ये आला. त्याचे पेटकर कुटुंबीयांशी काही कारणावरून वाद झाले.
बाप व दोन्ही मुलांनी त्या मुलाला शिवीगाळ करून लाथा बुक्यानी मारहाण केली. यावरच ते थांबले नाही तर त्याच्या डोक्यात लोखंडी रॉड व दगड घालून त्याचा खूनच केला. ही घटना कळताच पोलीसही घटना स्थळी पोहचले. त्यांनी तिघांना ताब्यात घेतले.
सकाळी मृत तरुणाचे नातेवाईक पोलीस ठाण्यात आले. त्यांना कडक शिक्षा करा. सोडू नका अशी त्यांची मागणी होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांनी त्यांची समजूत घालून कडक कारवाईचे आश्वासन दिले. नातेवाईक तेथून घरी परताच त्यांनी खून करणाऱ्या पेटकर कुटुंबीयांच्या घरावर दगडफेक करून मोडतोड सुरू केली. यावेळी घरात कोणी नव्हते.
ही घटना कळताच पोलीस तत्काळ तेथे पोहचले. त्यांनी परिस्थिती लगेच नियंत्रणात आणली. तेथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. आरोपींच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करणार असल्याची भूमिका नातेवाईकानी घेतली होती. अखेर परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलिस आयुक्त प्रांजली सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे, सागर गोरे, पंडित डोंगरे यांनी त्या कुटुबियांची समजूत काढली. यानंतर दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.