विंग : घरगुती भांडणात पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना विंग येथे मध्यरात्रीच्या सुमारास घडली. मयूरी मयूर कणसे (वय २७) असे मृत पत्नीचे नाव आहे. पती मयूर यशवंत कणसे (वय ३०) यास पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात अटक केली आहे. मयूरचा चुलत भाऊ विशाल सदाशिव कणसे याने पोलिसात फिर्याद दिली आहे. पत्नी जास्त बोलत असल्याच्या रागात तिचा गळा दाबल्याची कबुली पती मयूरने पोलिसांजवळ दिली आहे.
पोलिसांनी सांगितले, की मयूर कणसे याचे मयूरी याच्याशी २०१८ मध्ये लग्न झाले. त्यानंतर एकाच वर्षात त्यांच्यात वाद सुरू झाला. घरातील लोकांशी पटत नसल्याची मयूरीची तक्रार होती. त्यामुळे घरातील लोकांसोबत तिचे नेहमीच खटके उडत होते. त्या वादामुळे ती नवऱ्याला सोडून माहेरीही गेली होती. त्यानंतर चार महिन्यांपासून मयूरी व मयूर त्यांच्या मुलासह फ्लॅटमध्ये भाड्याने राहायला आले होते. त्यांचा बेकरीचा व्यवसाय होता.
मात्र, त्यांच्यात वरचेवर वाद होत होता. तसा वाद काल मध्यरात्रीही सुरू होता. त्या वेळी रागात त्याने पत्नीला मारले. त्या रागतच त्याने आपल्या पत्नीचा गळा आवळला. त्यात मयूरीचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर मयूरने त्याची सगळी हकिगत फिर्यादी विशाल कणसे याला सांगितली. त्यानुसार पोलिसांनी त्याची फिर्याद घेतली आहे. विशाल कणसे यांनी दिलेल्या फिर्यादीत काल मध्यरात्री मयूरने फोनवरून सांगितले, की त्याने मयूरीचा गळा आवळून खून केला आहे.
ती लय बोलायला लागल्याने मी तिचा गळा आवळून खून केला आहे. तशीच माहिती विशालने पोलिसांना दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल आहे. मयूरचा फोन आल्याने विशाल त्वरित तेथे पोचला. त्याच्यासोबत मयूरचा भाऊ महेश कणसेही होता. त्या दोघांनीही मयूरीला आवाज देऊन उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिची काही हालचाल दिसत नव्हती.
त्या वेळी गावातील काही जणांच्या मदतीने मयूरीला कारमधून कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्यावेळी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत्यू झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर, पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. पोलिसांनी पती मयूर यास अटक केली आहे.