कॅपिटल इन्फ्रा ट्रस्टचा आयपीओ 7 जानेवारीला उघडणार, 1077 कोटी रुपयांचे नवीन युनिट्स जारी
ET Marathi January 04, 2025 02:45 PM
मुंबई : इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट कॅपिटल इन्फ्रा ट्रस्टचा आयपीओ 7 जानेवारी रोजी उघडणार आहे. गुंतवणूकदारांना या आयपीओसाठी 9 जानेवारीपर्यंत बाेली लावता येईल. कॅपिटल इन्फ्रा ट्रस्ट पूर्वी नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्ट म्हणून ओळखला जात असे. आयपीओद्वारे 1,578 कोटी रुपये उभारण्याचे ट्रस्टचे उद्दिष्ट आहे. आयपीओमध्ये 1,077 कोटी रुपयांपर्यंतचे नवीन युनिट्स असतील. तसेच, 501 कोटी रुपयांची युनिट्स ऑफर फाॅर सेलमध्ये असतील. कॅपिटल इन्फ्रा ट्रस्टने 99-100 रुपये प्रति युनिट किंमत बँड निश्चित केला आहे. कॅपिटल इन्फ्रा ट्रस्टने आयपीओमधील 75 टक्के हिस्सा संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आणि 25 टक्के बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला आहे. आयपीओ बंद झाल्यानंतर युनिट्सचे वाटप 14 जानेवारीला अंतिम होईल. 17 जानेवारीपासून युनिट्समध्ये ट्रेडिंग सुरू होईल.कॅपिटल इन्फ्रा ट्रस्टची स्थापना गवार कन्स्ट्रक्शनने सप्टेंबर 2023 मध्ये पायाभूत सुविधा गुंतवणूक ट्रस्ट म्हणून केली होती. त्याचे मुख्य उद्दिष्ट नऊ पूर्ण झालेल्या आणि कमाईची प्रारंभिक पोर्टफोलिओ मालमत्ता प्राप्त करणे, व्यवस्थापित करणे आणि गुंतवणूक करणे हे आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये ऑपरेशन्समधून कॅपिटल इन्फ्रा ट्रस्टचा महसूल 1,485 कोटी रुपये होता. मागील आर्थिक वर्षातील 2,033 कोटी रुपयांच्या महसुलापेक्षा हा आकडा खूपच कमी आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये नफा 125.8 कोटी रुपयांपर्यंत घसरला, जो आर्थिक वर्ष 2023 मध्ये 497.2 कोटी रुपये होता. सप्टेंबर 2024 मध्ये संपलेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत नफा 115.4 कोटी रुपये होता आणि महसूल 705.4 कोटी रुपये होता.कॅपिटल इन्फ्रा ट्रस्ट आर्थिक कर्जदार आणि प्रायोजकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी त्याच्या आयपीओमध्ये नवीन युनिट्स जारी करण्यापासून उभारलेल्या निधीचा वापर करेल. ट्रस्टचे एकमेव विश्वस्त म्हणून अॅक्सिस ट्रस्टी सर्विसेज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर बुक रनिंग लीड मॅनेजर एसबीआय कॅपिटल मार्केट्स आणि एचडीएफसी बँक आहेत.