'मेट्रो'ने देशात नवीन कार्यसंस्कृती आणली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Inshorts Marathi January 06, 2025 04:45 AM

नागपूर, दि. ०५: ‘मेट्रो’ ने देशात सर्वात जलद गतीने पूर्ण होऊन जनतेला उत्कृष्ट सेवा उपलब्ध करून दिली आहे, त्यामुळेच नागपूरच्या पायाभूत सुविधा व नागरीकांच्या जीवनात अमूलाग्र बदल झाल्याने देशात नवीन कार्यसंस्कृती निर्माण केल्याचा गौरवपूर्ण उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

येथील क्रॉसवर्ड येथे एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक यांच्या ‘बेटर दॅन द ड्रिम्स’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृतीचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्य हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी अर्थ व नियोजन राज्य मंत्री ॲड. आशिष जयस्वाल, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापक संचालक ब्रिजेश दीक्षित मंचावर उपस्थित होते.

नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील यशस्वीते नंतर दुसऱ्या टप्प्यालाही सुरुवात झाली आहे. दुसरा टप्पा हा ग्रामीण क्षेत्राशी जोडण्यात येत असल्यामुळे जनतेलाही चांगल्या सेवा मिळणार असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले की मेट्रोने केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण नियोजनामुळे देशातील इतर राज्यातूनही मागणी होत आहे. मेट्रोमुळे नागपूर शहराच्या जीवनशैलीतही बदल झाला आहे. या परिवर्तनाची यशोगाथा या पुस्तकाच्या माध्यमातून सादर करण्यात आली आहे.

राज्यातील पहिली मेट्रो मुंबईत सुरू झाली आणि ती अकरा वर्षात अकरा किलोमीटरचा टप्पा पूर्ण करु शकली. परंतु, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केवळ पाच वर्षात तीनशे किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला आहे. नागपूर मेट्रो चार वर्षात 32 किलोमीटर, दुसऱ्या टप्प्यातील कामालाही सुरुवात झाली आहे त्याप्रमाणेच पुणे मेट्रो सुद्धा अत्यंत जलदगतीने पूर्ण झाली असल्यसाचे सांगताना श्री. फडणवीस म्हणाले की, या कामाचे श्रेय तत्कालीन प्रबंध संचालक ब्रिजेश दीक्षित यांचे आहे.

मेट्रो ची सुरुवात करताना नागपूर मेट्रो कंपनीची स्थापना करण्यात आली त्यानंतर पुण्याच्या मेट्रो चे काम या कंपनीमार्फतच सुरू करण्यात आले. पुणेकरांनी नागपूरची कंपनी पुण्याची मेट्रो तयार करेल का अशी शंका निर्माण केली त्यामुळे महामेट्रो ही कंपनी स्थापन करण्यात आली.

प्रारंभी या पुस्तकाच्या लेखिका सरिता कौशिक यांनी नागपूर मेट्रोमुळे जीवनशैलीवर झालेल्या परिणामांची ओळख, वेगवेळ्या घटकातील लोकांवर परिणाम करणाऱ्या घटना, झालेला विकास, तसेच शहराचा इतिहास या पुस्तकाच्या माध्यमातून मांडण्यात आल्याचे सांगितले.

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. दीक्षित यांनी नागपूर मेट्रोची सुरुवात आणि त्या मागील संकल्पना आणि ती प्रत्यक्ष उतरविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.

प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘बेटर दॅन ड्रिम्स’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन केले. यावेळी नागपूर मेट्रो च्या विविध टप्यातील घटनांचा उल्लेख आपल्या भाषणात केला. स्वागत राजू अरोरा यांनी तर कार्यक्रमाचे संचालन निधी काळे यांनी केले.

००

The post first appeared on .

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.