सध्या उद्धव ठाकरे यांच्यासाठी आव्हानाचा काळ आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालाने सगळच चित्र स्पष्ट झालाय. खरी शिवसेना कोणाची? या प्रश्नाच उत्तर राज्यातील जनतेने दिलं आहे. अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडीच सरकार कोसळलं, त्यावेळी शिवसेनेत फूट पडली. 40 आमदारांनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य करुन भाजपसोबत युती सरकार बनवलं. उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यानंतर फक्त 15 आमदार उरले होते. राज्यात शिवसेनेत दोन गट निर्माण झाले. निवडणूक आयोगात हा विषय गेल्यानंतर त्यांनी लोकप्रतिनिधींची संख्या कोणासोबत जास्त आहे? हे लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अधिकृत पक्ष म्हणून मान्यता दिली.
पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह गेल्यानंतर खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे यांच्यासाठी कसोटीचा काळ सुरु झाला. सुरुवातीला फक्त 40 आमदार आणि काही खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. त्यानंतर राज्यभरातील अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी, जिल्हाप्रमुखांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी मशाल या निवडणूक चिन्हावर 9 खासदार निवडून आणले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 7 खासदार निवडून आले. त्यानंतर खरा सामना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत होता. यावेळी मात्र एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने बाजी मारली.
एकनाथ शिंदे यांना मुंबईतही दमदार यश
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने 57 जागा जिंकल्या. उद्धव ठाकरे गटाला फक्त 20 जागांवर समाधान मानावं लागलं. त्यात उद्धव ठाकरे गटाचे निम्मे आमदार मुंबईतील आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबईतही बऱ्यापैकी यश मिळवलं आहे. सहाजिक एवढ मोठ यश मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा ओघ वळण स्वाभाविक आहेत.
कालच्या दिवसात ठाकरे गटाला दोन धक्के
काल धुळ्याचे शिवसेना ठाकरे गटाचे सह संपर्क प्रमुख हिलाल माळी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी आपल्या हजारो समर्थकांसह एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ठाण्यात शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता ऐरोलीचे जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. पुढच्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेच्या निवडणुका लागू शकतात. त्या पार्श्वभूमीवर पक्षाला एकसंध ठेवण्याच मोठ आव्हान उद्धव ठाकरे यांना पेलाव लागणार आहे.