पर्यटन वाढीसाठी पायाभूत सुविधांचा विकास करा – मंत्री शंभूराज देसाई
Inshorts Marathi January 07, 2025 04:45 AM

मुंबई दि. ०६: राज्यातील पर्यटनाला गती देण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास व पर्यटन उपक्रमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी त्याच बरोबर आगामी शंभर दिवसात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांवर भर देण्याचे निर्देश पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीस पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, पर्यटन सचिव जयश्री भोज, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी यांसह अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. देसाई म्हणाले की, देशातंर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्यातील पर्यटन वाढावे यासाठी गाव ते राज्यस्तरापर्यंत जिथे पर्यटनस्थळांचा विकास केला जात आहे त्याची प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याकडून माहिती मागवून पर्यटन विकासासाठी सर्वसमावेशक धोरण राबवावे, नवीन पर्यटन धोरण, पर्यटन संचालनालयाकडे वर्ग करण्यात आलेली कामे, पर्यटन स्थळांची वर्गवारी, प्रसिद्धी उपक्रम, कृषी पर्यटन धोरण, साहसी पर्यटन धोरण, कॅरॅव्हॅन धोरण, बीच शॅक धोरण इत्यादी धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करावी.

पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, हे लक्षात घेता पर्यटन वाढीसाठी ‘पर्यटन धोरण 2024’ ची प्रभावी अंमलबजावणी करणे, विविध पर्यटन धोरण, पर्यटन संचालनालयामार्फत सुरू असलेले उपक्रम, प्रादेशिक पर्यटन विकास आराखडे, केंद्र सरकारच्या मदतीने सुरू असलेले प्रकल्प यांना गती देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यातील प्रत्येक विभाग व हंगामानुसार विविध महोत्सवांचे नियोजनूपर्वक आयोजन करणे. जिथे पर्यटन वाढू शकते अशा ठिकाण शोधून अशा पर्यटनस्थळांचा विकास करणे यावर पर्यटन विभागाने भर द्यावा. सुरक्षित आणि जबाबदार पर्यटनावर आधारित उपक्रम राबवावा, असेही मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

The post first appeared on .

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.