Nashik News : जिल्ह्यात शंभर एकर जागेवर 'लघुउद्योग पार्क'साठी प्रयत्न : सोनाली मुळे
esakal January 10, 2025 06:45 PM

सातपूर : जिल्ह्यात शंभर एकर जागेवर ‘लघुउद्योग पार्क’ उभारण्याचा मानस मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारसू यांचा असून, त्यासाठी लवकरच जागेचा शोध घेऊन ही योजना साकारण्यात येईल. तसेच काळानुसार बदल करणे व गतिमान राहणे गरजेचे आहे. त्याच धर्तीवर नवीन वर्षात एमआयडीसीचा कारभार गतिमान व पारदर्शक करण्याचे धोरण स्वीकारले असून, आता ‘प्रशासन दारी’ हा उपक्रम राबवत असल्याने गुरुवारी (ता. ९) नाशिकमध्ये येऊन आढावा बैठकीत घेत सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे, असे एमआयडीसीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे यांनी माध्यमाशी बोलताना सागितले.

सोनाली मुळे यांनी सांगितले, की मागील दोन वर्षांत एमआयडीसीने अनेक वर्षांपासून रखडलेली जुन्या धोरणांमध्ये बदल करत उद्योगांना सहकार्य करण्याचे सकारात्मक व धोरणात्मक निर्णय घेतले. तसेच विविध क्लस्टर व नव्या औद्योगिक वसाहतींसाठी भूसंपादनाची प्रक्रिया राबविली. ही प्रक्रिया अजून गतिमान करण्यासाठी नव्या वर्षात एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू यांच्या मार्गदर्शनाखाली कामाला गती देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मी स्वतः आठवड्याला येऊन नाशिकच्या फायलींचा प्रवास नाशिकमध्येच थांबवत आहे.

आज दिवसभरात मागील आठवड्यातील कामांचा आढावा घेऊन पुढील नियोजन करण्याच्या सूचना प्रादेशिक अधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच आढवण, मापारवाडी, जांबुटके, राजूरबहुल्यासह इतर नव्या औद्योगिक वसाहतीसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेस अधिक गती देऊन उद्योजकांना भूखंड उपलब्ध करून देण्याचा एमआयडीसी प्रशासनाचा पारदर्शक प्रयत्न आहे, असेही श्रीमती मुळे यांनी या वेळी सांगितले. या वेळी नाइसचे रमेश वैश्य, दिनेश पाटील, ज्येष्ठ उद्योजक जयप्रकाश जोशी, प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबीयांनी भेट घेत आपल्या मागण्या मांडल्या.

तांत्रिक गोष्टी दूर करण्याचा प्रयत्न

अंबड औद्योगिक वसाहतीमधील गाळे प्रकल्पाच्या निविदेबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. याबाबत अनेक लघुउद्योजकांनी मुळे यांची भेट घेऊन ही प्रक्रिया रद्द न करता ती पूर्ण करावी, अशी मागणी केली. त्यावर मुळे यांनी मुंबईत बैठक घेऊन यातील तांत्रिक गोष्टी दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.