Khandoba-Mhalasa Yatra : खंडोबा-म्हाळसा यात्रेसाठी पालनगरी सज्ज : भाविक, दुकाने, खेळणी होऊ लागली दाखल; उद्या मुख्य दिवस
esakal January 10, 2025 06:45 PM

-संतोष चव्हाण

उंब्रज : महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र देश राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पाल (ता. कऱ्हाड) येथील खंडोबा-म्हाळसा यात्रेचा मुख्य दिवस शनिवारी आहे. या वर्षी होऊ घातलेल्या यात्रेसाठी प्रशासन व देवस्थान कमिटी, ग्रामपंचायत प्रशासनाने यात्रेची तयारी पूर्ण केली आहे. यात्रेसाठी पालनगरी सज्ज झाली आहे.

यात्रेत भाविकांना सर्वोतोपरी सेवा देण्याचा मानस प्रशासनासह यात्रा कमिटी, ग्रामपंचायत करत आहे. पाल देवस्थान ट्रस्टने काशीळ- हरपळवाडी मार्गे येणाऱ्या भाविकांसाठी दर्शनबारीचे काम पूर्ण केले आहे. उत्तरेकडील वाळवंटात यात्रेसाठी मेवा, मिठाईची दुकाने, सिनेमागृहे, पाळणे यासह तंबू उभे राहिले आहेत. यात्रेतील भाविकांवर लक्ष ठेवण्यासाठी ठिकठिकाणी वॉच टॅावर उभारले आहेत. देवस्थान ट्रस्टने मंदिर परिसरात व लग्न सोहळा मंडपात अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याने परिसरावर सीसीटीव्हीचा वॉच राहणार आहे.

काशीळ-पाल मुख्य रस्त्यालगत मेवामिठाई, खेळणी व छोटी हॅाटेल व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. यात्रेसाठी लांबून येणाऱ्या भाविकांचा ओघ सुरू झाला आहे. पालनगरी हळूहळू फुलू लागली आहे. एसटी प्रशासनाने काशीळ-पाल रस्त्यावर आदर्शनगर येथे तात्पुरत्या बसस्थानकाची तयारी केली आहे.

लांब पल्यावरून येणाऱ्या भाविकांना सेवा देण्यासाठी एसटी प्रशासन सज्ज झाले आहे. आरोग्य विभाग, ग्रामपंचायत प्रशासन, देवस्थान ट्रस्ट, यात्रा समिती तसेच, सर्व शासकीय विभागाने त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या आहेत.

ग्रामपंचायतीकडून तयारी

खंडोबा- म्हाळसा विवाह सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत प्रशासन, यात्रा समिती, कार्यकर्ते यांनी योग्य व्यवस्था केली आहे. दोन्ही नदीपात्रे स्वच्छ केली आहेत. भाविकांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्ट्रीट लाइट व सीसीटीव्ही वॉच यंत्रणा अशी व्यवस्था केली आहे. भाविकांना यात्रा कालावधीत सुलभ शौचालयांची व्यवस्था ग्रामपंचायतीने उभारली आहे. भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य विभागास योग्य त्या सूचनाही केल्या आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.