सावंतवाडी पालिका क्षेत्रात
नायलॉन मांजास प्रतिबंध
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १५ ः पतंग उडविण्यासाठी वापरला जाणारा प्लास्टिक किंवा सिंथेटिक पदार्थापासून तयार केलेला चिनी मांजा, चिनी दोरा, नायलॉन अथवा प्लास्टिक मांजा हा माणसासाठी तसेच पक्ष्यांना घातक ठरू शकतो. त्यामुळे या मांजाच्या वापरावर सावंतवाडी नगरपरिषद क्षेत्रात प्रतिबंध केला आहे. सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी ही माहिती दिली.
पतंग उडविण्यासाठी तीक्ष्ण धातू किंवा धातूचे घटक किंवा चिकट पदार्थ, तसेच धागा मजबूत करणारा पदार्थ नसलेला केवळ सुती धागा वापरण्यास परवानगी आहे. चिनी मांजा म्हणून ओळखला जाणारा हा धागा तयार करण्यासाठी बारीक चुरा केलेली काच, धातू किंवा अन्य तीक्ष्ण पदार्थांचा वापर करण्यात येतो. अशा धाग्याचे उत्पादन, विक्री, साठवण आणि वापर यावर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने निर्बंध घातले आहेत. या धाग्याचे जैविकरित्या विघटन होत नसल्याने मलप्रणाली, जलनिःसारण बाधित होते. तसेच असे पदार्थ खाल्ल्याने जनावरांनाही इजा होते. हा धागा विद्युतवाहक असल्याने वीज साहित्य आणि वीज उपकेंद्र यांच्यावरही भार येऊन वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता असते. सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्या निर्देशानुसार शहरात तपासणी आणि जप्ती मोहीम राबविण्यात येत आहे. स्थानिक पोलिसांनाही यासंदर्भात माहिती दिली आहे. आतापर्यंत या तपासणी मोहिमेत आस्थापनांची तपासणी करता, त्यांच्याकडे चिनी मांजा आढळला नाही. याबाबतच्या तक्रारी करण्यासाठी टोल फ्री क्रमांक नागरिकांसाठी उपलब्ध केला आहे. तसेच cosawantwadi@gmail.com या ई-मेलवरही तक्रार नोंदविता येईल, असे आवाहन मुख्याधिकारी साळुंखे यांनी केले आहे.