पोलादपूरमधील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मागणी
पोलादपूर, ता. १५ (बातमीदार) ः पोलादपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. याकडे पोलिस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत ठाकरे गटाकडून पोलादपूर पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले होते, मात्र त्याकडे पोलिस प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने येत्या २६ जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
पोलादपूर तालुक्याच्या विकासात भर पडत असताना, अवैध धंद्यांनीदेखील डोके वर काढले आहे. शहरात मोठ्या प्रमाणात जुगार, मटका, वातानुकूलित क्लब सुरू आहे. त्यामुळे शहरातील तरुणाईसह नागरिक या अवैध मार्गाकडे आकर्षित होत असल्याने अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत, मात्र पोलिस प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाकडून पोलादपूर पोलिस ठाण्यात १ जानेवारी रोजी सदर अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आले होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे येथील अवैध धंद्यांवर येत्या काही दिवसांत कारवाई न झाल्यास २६ जानेवारी रोजी ठाकरे गटाकडून उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याप्रकरणी नीलेश सुतार (शहरप्रमुख), अमोल भुवड, दिलीप भागवत, स्वप्नील भुवड, वकील सचिन गायकवाड आदींच्या सह्यांचे निवेदन पोलादपूर पोलिस ठाणे, तहसील कार्यालय यांना देण्यात आले आहे.