कल्याण-बदलापूर मार्गावर अपघात
विजेच्या खांबाला धडकल्याने दुचाकीस्वार जखमी
अंबरनाथ, ता. १५ (वार्ताहर) : कल्याण-बदलापूर मार्गाच्या मधोमध असणाऱ्या विजेच्या खांबामुळे पुन्हा एकदा अपघात झाला आहे. अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अंबरनाथमधील डीएमसी चौकातील या अपघाताच्या घटनेमुळे पुन्हा एकदा चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
काही दिवसांपूर्वीच कल्याण-बदलापूर महामार्गाच्या मधोमध असणाऱ्या विजेच्या खांबामुळे एका रिक्षाचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच मंगळवारी (ता.१४) पुन्हा एक दुचाकीस्वार या विजेच्या खांबाला धडकल्याने गंभीर जखमी झाला आहे. सकाळच्या सुमारास संजय प्रजापती नेहमीप्रमाणे कामाला जात होते. या वेळी डीएमसी चौकातील एका खांबाला त्यांची दुचाकी धडकली. या अपघातात त्यांच्या पायाला गंभीर जखम झाली आहे, तर प्रजापती यांच्या दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. रस्त्याच्या मधोमध विजेचा खांब आहे. प्रजापती यांना अंदाज आला नाही. त्यामुळे हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शीचे मत आहे. आता या घटनेनंतर विजेचे खांब हटवण्याची मागणी होत आहे.