घोडबंदर मार्गाची ‘कोंडी’ फुटणार
अवजड वाहनांना लवकरच बाहेरचा रस्ता : वाहतूक शिस्तीसाठी अधिकच्या १०० वाॅर्डनची नियुक्ती
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : घोडबंदरवासीयांनी भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढा वाचल्यानंतर आता ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या पट्ट्यातील कोंडी फोडण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषत: वाहतूक कोंडीच्या समस्येतून कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी अवजड वाहनांना शहराबाहेर नवी मुंबई, मिरा-भाईंदर येथे जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट करत सर्वप्रथम ‘शिस्ती’साठी जादा शंभर वॉर्डनची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत.
घोडबंदर रोडवरील नागरिकांना भेडसावत असलेल्या विविध समस्यांबाबत बुधवारी (ता. १५) येथील नागरिकांनी खासदार नरेश म्हस्के यांची प्रथम भेट घेतली. या बैठकीत पाणी, वाहतूक कोंडी, कचरा कोंडी आदी समस्या मांडण्यात आल्या. त्यानंतर खासदारांच्या सूचनेनंतर पालिका आयुक्त तोडगा काढण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या दालनात घोडबंदर रोड येथील ''जस्टीज फॉर घोडबंदर रोड'' फोरमचे प्रतिनिधी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, शहर अभियंता प्रशांत सोनग्रा यांच्यासह वाहतूक पोलिस, महापालिका, मेट्रो, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रतिनिधींसह बैठक झाली. या वेळी अवजड वाहनांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नवी मुंबई, मिरा-भाईंदर येथे जागा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वंकष चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले. घोडबंदर रोडवरील वाहतूक समस्येतून नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी वाहतूक विभागाच्या मदतीसाठी सध्या जे वॉर्डन उपलब्ध आहेत. त्यात आणखी प्रशिक्षित १०० वॉर्डन तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत वाहतूक विभागाशी चर्चा करण्यात येईल. वाहतूक पोलिस आणि वॉर्डन यांच्यात समन्वय ठेवण्याच्या दृष्टीनेही नियोजन केले जाईल, असेही आयुक्त सौरभ राव यांनी या वेळी सांगितले.
धुळीमुळे झेब्रा क्रॉसिंगचे उडाले रंग
ठाणे महापालिकेने गेल्या वर्षी शहरातील झेब्रा कॉसिंगला गडद लाल, पांढरा रंग दिले होते; मात्र काही कालावधीतच त्याचे रंग उडाले आहेत. धुळीमुळे हे रंग उडाल्याचे कारण आता देण्यात येत आहे; मात्र त्यामुळे नागरिकांना रस्ता ओलांडणे कठीण होत असल्याने पुन्हा झेब्रा क्रॉसिंगची रंगरंगोटी करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. याशिवाय घोडबंदर मार्गावर लेन मार्किंग, दिशादर्शक, दुभाजक, झेब्रा क्रॉसिंग, ज्या ठिकाणी रात्रीच्या वेळी जादा प्रकाशाची व्यवस्था हवी आहे, तिथे ती सोय करण्यात येईल, असेही आयुक्त राव म्हणाले. रस्त्याच्या कडेला उभी असलेली बेवारस वाहने उभी असतात, ती तत्काळ काढण्याबाबत आरटीओशी संपर्क साधण्याच्या सूचनाही त्यांनी या वेळी अधिकाऱ्यांना दिल्या.
यांत्रिकी पद्धतीने रस्त्यांची सफाई
घोडबंदर रोडवरील कचरा हा सकाळ-संध्याकाळ अशा दोन सत्रात उचलला जात असला तरी अनेक ठिकाणी नागरिक कचरा टाकतात, अशा नागरिकांना दंड लावण्याची मागणी बैठकीस उपस्थित असलेल्या नागरिकांनी केली. जर दंड लावला, तर नागरिक स्वच्छतेबाबत जागरूक होतील, अशीही सूचना या वेळी करण्यात आली, तसेच येत्या काही दिवसांत घोडबंदर रोडवरील रस्त्यांची सफाई यांत्रिकी पद्धतीने करण्यात येणार असल्याचेही या बैठकीत उपायुक्त मनीष जोशी यांनी नमूद केले.