ओतूर, ता. १५ ः आलमे (ता. जुन्नर) येथील ज्ञानदा शिक्षण मंडळ नारायणगाव संचलित अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवनेरी किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविल्याची माहिती संस्थेचे सचिव अमित बेनके व मुख्याध्यापक भगीरथ पठारे यांनी दिली.
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ज्ञानदा शिक्षण मंडळ नारायणगाव संचलित अनुदानित आश्रमशाळा, आलमे या शाळेतील १८० विद्यार्थ्यांनी शिवनेरी किल्ला या ऐतिहासिक स्थळाला भेट दिली. तसेच एक पर्यावरण पूरक उपक्रम म्हणून शिवजन्म स्थळापासून ते पहिल्या दरवाजापर्यंत किल्ल्यावर असणारा प्लास्टिक कचरा गोळा केला. या ठिकाणी १२ पोती प्लास्टिक कचरा गोळा करून वनविभागाकडे ताब्यात देण्यात आला. विद्यार्थ्यांनी राबविलेल्या स्वच्छता मोहिमेचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.