Tula Japanar Ahe Cast: गेल्या काही महिन्यात मराठी वाहिन्यांवर अनेक विषयांवरील मालिका सुरू झाल्या. काही मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. तर काही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. त्यात झी मराठी वाहिनीवरील 'लक्ष्मी निवास' या मालिकेचा देखील समावेश होता. ही मालिका नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला आली. आता त्यापाठोपाठ आणखी एक मालिका सूरू होणार आहे. झी मराठीने 'तुला जपणार आहे या मालिकेचा प्रोमो यापूर्वी प्रदर्शित केला होता. आता या मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
झी मराठीवर यापूर्वी अनेक थ्रिलर मालिका सुरू करण्यात आल्या. या ना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. आता अशाच धाटणीची आणखी एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'तुला जपणार आहे' या मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आलाय. हा प्रोमो इतका जबरदस्त आहे की नेटकरी त्याचं कौतुक करताना दिसतायत. आई आपल्या मुलीच्या रक्षणासाठी मृत्यूनंतरही कशी अनेक अग्निदिव्याला सामोरी जाते हे या मालिकेत पाहायला मिळणार आहे.
आई-वडील आणि त्यांची लहान मुलगी यांच्या सुखी कुटुंबाला अचानक दृष्ट लागते आणि आईचं म्हणजेच मुख्य नायिकेचं निधन होतं. यानंतर मालिकेतली खलनायिका नायकाशी लग्नाचा घाट घालते. मात्र, तिला लहान मुलीविषयी कोणतीच आपुलकी नसते. दुसरीकडे, निधनानंतरही आपल्या लेकीच्या संरक्षणासाठी मुख्य नायिका देवीआईकडे प्रार्थना करत असल्याचं या मालिकेच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
'तुला जपणार आहे' ची स्टार कास्टया मालिकेत अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर कलर्सवरील 'शेतकरीच नवरा हवा' या मालिकेतील नायिका ऋचा गायकवाड या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. तर 'सारं काही तिच्यासाठी' मधील अभिनेता नीरज गोस्वामी यात मुख्य भूमिकेत दिसतोय. याशिवाय महिमा म्हात्रे, मिलिंद पाठक, निलेश रानडे, शर्वरी लोहकरे, सिद्धीरुपा कर्माकर आणि बालकलाकार अधिकी कसबे अशी स्टार कास्ट या मालिकेत पाहायला मिळतेय.