Mumbai Latest News: रोहित शर्मा रणजी क्रिकेट लढतीत खेळणार की नाही, हे अद्याप गुलदस्त्यात आहे मात्र तो चॅम्पियन्स करंडकात भारतासाठी खेळणार असल्याचे संकेत शुक्रवारी मिळाले आहेत. सफेद चेंडूने रोहित सराव करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. त्यावरून रोहितने चॅम्पियन्स क्रिकेट करंडकाची तयारी सुरू केली असल्याचे समजते.
३७ वर्षीय रोहित शर्मा याने सफेद चेंडूने कसून सराव केला. या सरावादरम्यान तो फ्लिक, ड्राईव्ह, लॉफ्टेड व पुल असे त्याच्या आवडीचे फटके मारताना दिसला. रोहितच्या या तयारीवरून तो थेट चॅम्पियन्स करंडकात सहभागी होणार असल्याचे जाणवते. २३ जानेवारीपासून रणजी करंडकाच्या पुढल्या फेरीला सुरुवात होणार आहे. मुंबईसमोर या लढतीत जम्मू काश्मीरचे आव्हान असणार आहे. या लढतीसाठी मुंबईच्या संघाची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. रोहित शर्माच्या या लढतीतील सहभागावरही प्रश्नचिन्ह कायम आहे.
सुमार फॉर्म
रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाला मागील दोन कसोटी मालिकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया या देशांकडून हार पत्करावी लागली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या कसोटीत त्याने स्वत:हून न खेळण्याचा निर्णय घेतला. नेतृत्वासह तो फलंदाजीतही अपयशी ठरत आहे. त्याच्या बॅटमधून धावा निघत नाहीत.
यामुळे चोहोबाजूंनी त्याच्यावर टीका होऊ लागली आहे. रोहित कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होईल अशी चर्चाही रंगू लागली, मात्र रोहितने आपण खेळत राहणार असल्याचे सांगत सर्व शंकाकुशंकांना पूर्णविराम दिला.