मुंबई – शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडणार अशा बातम्या विधानसभा निवडणुकीनंतर येत आहेत. त्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सारवासारव आणि स्पष्टीकरण देखील येत आहे. आता पुन्हा एकदा काँगेस नेत्यांनी आणि शिवसेना ठाकरे गटाला डिवचलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. मराठी माणसांचा मुद्दा सोडून हिंदुत्व स्विकारलं ही शिवसेनेची सर्वात मोठी चूक आहे, असं हुसेन दलवाई यांनी म्हटलं आहे. मराठीचा मुद्दा सोडून शिवसेनेनं हिंदुत्व स्वीकारलं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मदत केली. शिवसेनेच्या त्या चुकीमुळेच मुंबईचे गुजरातीकरण होतं आहे, असा आरोप हुसेन दलवाई यांनी केला आहे.
आगामी महापालिका निवडणुकीची तयारी शिवसेना ठाकरे गटाकडून सुरु आहे. यासाठीच्या बैठकांमध्ये माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंकडून मार्गदर्शन केले जात आहे. यात शिवसेनेने (ठाकरे) हिंदुत्वाचा मुद्दा सोडला नाही, हे जनतेपर्यंत पोहचवा असे आदेश देण्यात आले आहे. त्याताच त्यांच्या सहकारी पक्षाकडून हिंदुत्वावरुनच ठाकरे गटाला डोस देण्यात आला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई म्हणाले की, मराठी माणसांचा मुद्दा सोडून हिंदुत्व स्वीकारणं ही शिवसेनेची सर्वात मोठी चूक आहे. मराठीचा मुद्दा सोडून शिवसेनेनं हिंदुत्व स्वीकारलं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मदत केली. शिवसेनेच्या त्या चुकीमुळे मुंबईचे गुजरातीकरण होतं आहे, शिवसेनेनं (ठाकरे) मराठीचा मुद्दा आता पुन्हा हातात घ्यावा, असा सल्ला दलवाईंनी दिला आहे.
शिवसेनेच्या मराठी मुद्दासोडल्यामुळे महाराष्ट्रावर संकट आलं, मुंबईत मराठी माणसावर अन्याय होतो, असंही दलवाई म्हणाले. हुसेन दलवाईंच्या या वक्तव्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे गट आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) एकत्र लढणार नाहीत का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
शिवसेनेची स्थापनाच मुळात मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायातून झाली. मुंबई ही मराठी माणसांची आहे, तरीही मराठी माणसाला दुय्यम वागणूक मिळत असल्याच्या भावनेतून शिवसेनेचा मुंबईत जन्म झाला. कालौघात शिवसेनेने मराठी आणि मराठी माणसाचा मुद्दा मागे सोडून हिंदुत्वाच्या मुद्दायवर स्वार होण्याचा निर्णय केला. शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र येऊन याच मुद्याला पुढे करुन निवडणुका लढवल्या. यातून 1995 साली युतीची राज्यात पहिल्यांदा सत्ता देखील आली. मात्र त्यानंतर शिवसेना-भाजप युतीमध्ये मोठा भाऊ कोण यावरुन कायम वाद होत राहिले. यातूनच अखेर शिवसेनेने भाजपसोबतची 30 वर्षांची युती तोडली आणि पारंपारिक विरोधक काँग्रेस – राष्ट्रवादीसोबत जाऊन सत्ता स्थापन केली. महाविकास आघाडीचे सरकार अवघे दोन – अडीच वर्षे चालेल. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे हे सरकार कोसळले. सिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे सेना असे दोन गट झाले. खरी शिवसेना शिंदेंची असल्याचा निवाडा निवडणूक आयोगाने दिला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. यानंतर आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना पु्न्हा एकदा आपल्या हिंदुत्वावादी मुद्याकडे वळण्याची शक्यता वाटत असताना सहकारी पक्षाचे दलवाई यांनी शिवसेनेने पुन्हा मराठी माणसाचा मुद्दा हाती घेतला पाहिजे, असे म्हटले आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाची भूमिका काय राहणार हे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे.
हेही वाचा : CM Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर ठाकरे गट संतप्त; दानवे म्हणाले, राज्यकर्त्यांची नैतिकता संपली