>> डॉ.? प्रबोध चोबे
विविध व्हिटॅमिन्सच्या अभावामुळे होणाऱया रोगांचा एक-एक करत परामर्ष घेत व्हिटॅमिन्स हे पुस्तक अच्युत गोडबोले आणि डॉ. वैदेही लिमये या लेखकद्वयीने एखाद्या रहस्यकथेच्या थाटात अत्यंत रंजकपणे हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक वाचतांना विज्ञानाप्रती वाचकांची श्रद्धा द्विगुणित होते. आज जसे स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू, चिकनगुनिया, कॅन्सर, एडस् यासारखे रोग आपल्याला घाबरवून सोडतात. तसेच प्रत्येक शतकात त्याöत्या वेळी घाबरवून सोडणारे रोग होतेच. जीवनसत्त्वांच्या अभावामुळे निर्माण होणाऱया रोगांनी अनेक दशके माणसाला हादरवून सोडले होते. पण विज्ञानाने आज आपल्याला दाखवून दिले आहे की समतोल आहार घेतला तर हे सारे रोग पूर्णपणे नाहीसे होतात, असेच आज असाध्य वाटणाऱया रोगांचे संकट येत्या काही वर्षांत चुटकीसारखे सोडविले जाईल याबद्दल वाचकाच्या मनात हे पुस्तक वाचून विश्वास निर्माण होतो.
व्हिटॅमिन्सच्या शोधयात्रेच्या मार्गावर घडलेल्या घटनांचा आढावा लेखकांनी फार उत्तमरित्या घेतला आहे. शिक्षणाच्या दर्जाकडे लक्ष न पुरवता जर नुसती पदवीधरांची संख्या वाढवू दिली तर हे पदवीधर उद्या करणार काय? हा प्रश्न आपण आपल्याला विचारायला हवा. शे-दीडशे वर्षांपूर्वी सुद्धा अमेरिकेतल्या दक्षिण भागातील म्हणजेच मागास भागातील विद्यापीठे दर्जेदार होती हे या व्हिटॅमिन्स पुस्तकामध्ये दिसून येते. आपण या परिस्थितीपासून धडा शिकायला हवा. जीवनसत्वाबाबतच्या अनेक नाविन्यपूर्ण गोष्टींबाबत खुलासा करणारे मार्गदर्शक असे हे पुस्तक आहे.