सांगली, दि. ०२ (जिमाका) : जिल्ह्यात आवश्यक विकासात्मक कामे करण्यासाठी शासन व सीएसआरमधून आवश्यक निधी उपलब्ध करून घेऊ. सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन समन्वयाने काम करावे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पूर्ण केलेल्या कामांची प्रातिनिधीक पाहणी करणार, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण व अनु. जाती उपयोजना) संबंधी जिल्हा परिषदस्तर व राज्यस्तर कार्यान्वयन यंत्रणांच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बैठकीस जिल्ह्याच्या पालक सचिव विनिता वेद सिंगल, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह जिल्हास्तरीय यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
राज्य, जिल्हा परिषद व महापालिका, नगरपालिका स्तरावरील कार्यन्वयीन यंत्रणांचा तपशीलवार आढावा घेताना पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, सन 2023-24 ची संपूर्ण विकास कामे मार्च 2025 पूर्वी पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी. त्याचवेळी चालू सन 2024-25 या वर्षातील राज्य व स्थानिक स्तरीय यंत्रणांनी उर्वरित सर्व प्रशासकीय मान्यता 15 दिवसात पूर्ण करतानाच राज्य यंत्रणांनी 31 मार्च 2025 पूर्वी त्यांचा संपूर्ण खर्च होईल याची दक्षता घ्यावी, अनुसूचित जाती उपयोजना 2024-25 च्या प्रशासकीय मान्यता अत्यल्प असून सर्व प्रशासकीय मान्यता 15 दिवसात होतील यासाठी गांभीर्याने कार्यवाही करावी, असे त्यांनी निर्देशित केले.
लोकप्रतिनिधींच्या सूचना व स्थानिक गरज विचारात घेऊन जिल्ह्यातील विकासाचे नियोजन करावे, असे सांगून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, जिल्हा नियोजन समितीतून मिळणाऱ्या निधीचा विनियोग करताना प्रशासकीय व आर्थिक शिस्त पाळावी. कामे विहित मुदतीत पूर्ण होतील व कोणताही निधी समर्पित करावा लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. विकासात्मक कामे करताना चांगले प्रयोग करा. मूलभूत कामे करताना निधी कमी पडू देणार नाही. प्रत्येक महिन्याला विविध विभागांच्या कामांचा आढावा घेण्यात येईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पालक सचिव विनिता वेद सिंगल म्हणाल्या की, बदलापूरसारख्या घटना टाळण्यासाठी प्रत्येक शाळेत मुलामुलींचे प्रबोधन करावे. यासाठी स्वतंत्र तक्रार पेटी ठेवावी, महसूल व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनीच ती उघडावी. तसेच, शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सहावी ते आठवीपर्यंतच्या मुलांचे करियर कौन्सिंलिंग करावे, करार तत्त्वाने सेवा घेतलेल्या नॉन टिचिंग स्टाफची चारित्र पडताळणी करून घ्यावी.
हार, पुष्पगुच्छ न आणण्याचे आवाहन
जिल्ह्यात विविध ठिकाणी दौरे, बैठका, कार्यक्रमावेळी हार, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला जातो. पण आपण हार, पुष्पगुच्छ स्वीकारणार नसल्याने ते कोणीही सत्कारासाठी आणू नयेत. तसेच कार्यक्रमस्थळी फटाके फोडून प्रदूषण करू नये, असे आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले.
०००
The post first appeared on .