Maharashtra politics: मुंडेंना पदावरून काढले तरच सरकारची इज्जत राहील; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची खरमरीत टीका
Saam TV February 06, 2025 08:45 PM

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं. या हत्यामागे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा हात असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांसह विरोधकांनी केला.

काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी पुराव्यासकट धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. याच आरोपांवरून विरोधकांनी देखील धनंजय मुंडेंवर टीकेची तोफ डागली. यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी धनंजय मुंडेंवर टीकेचे बाण सोडले आहेत. 'भ्रष्टाचारात धनंजय मुंडेंचा सहभाग आहे, त्यांना मंत्री पदावरून काढले तरच सरकारची इज्जत राहील', अशा शब्दात त्यांनी टीकास्त्र डागलं.

'भ्रष्टाचारात सहभाग आहे. मुंडेंना मंत्री पदावरून काढले तरच सरकारची इज्जत राहील. अन्यथा असलेली इज्जत घालवून बसतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं हे सरकार भ्रष्टाऱ्यांचं सरकार आहे, असा मेसेज जाईल. सहकारी हत्येत सापडतात, सरकार हे बेशरमाचे झाड झालंय, असं म्हणायला हरकत नाही' अशी टीका त्यांनी मुंडेंवर केली.

'एक मंत्री भ्रष्टाचार करण्यासाठी सचिव आणि आयुक्तांच्या बदल्या करतात. त्यावर पांघरून घालण्यासाठी मुख्यमंत्री यांनी बदली केली. धनंजय मुंडेंच्या दबावावर सरकार चालत होते का? भ्रष्टाचार करण्यासाठी मुंडेंना एक प्रकारे मोकळीक दिली होती का?' असे प्रश्न विचारत त्यांनी मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत.

'सरकारचे डोकं विकृत झालेलं आहे'

टसंजय गांधी निराधार योजना कंत्राटदार अंगणवाडी सेविकांना पैसे मिळत नाही. मत घेऊन नेते खुर्ची उबवत आहे. संजय गांधी योजनेचा लाभ काढला आहे. नेत्यांची डोकी भ्रष्ट झालेली आहेत. लाडक्या बहिणींचा आकडा अडीच कोटीपर्यंत गेलेला आहे. आता हा आकडा पंचवीस ते तीस लाखांवर आणण्याचा प्लॅनिंग सुरू आहे. सरकारचे डोकं विकृत झालेलं आहे', अशा तिखट शब्दात यांनी फडणवीस सरकारवर टीकेचे बाण सोडले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.