कर्णधार रोहित शर्माचा गेल्या काही सामन्यांपासून सूर हरपला आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यातही फेल गेला. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीची चिंता वाढली आहे. कर्णधार रोहित शर्माने 7 चेंडूंचा सामना केला आणि फक्त दोन धावा करून बाद झाला. पहिल्या षटकात जोफ्रा आर्चरचा सामना करताना चाचपडला. त्यामुळे धावा करण्यासाठी थोडा धीर घेऊन खेळेल असं वाटलं होतं. पण साकीब महमूदने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्याच्या गोलंदाजीवर उंच फटका मारण्याच्या नादात चेंडू वर चढला. लिव्हिंगस्टोनने त्याचा सोपा झेल पकडला आणि तंबूत पाठवलं. आता कमबॅक करेल.. उद्या करेल.. असं करत 16 डाव खेळला. मात्र त्याला काही सूर गवसताना दिसत नाही. रोहित शर्माने 2024 /25 या वर्षात खेळलेल्या मागच्या 16 डावात 166 धावा केल्या आहेत. यात त्याचा 10.37 चा एव्हरेज आहे. 6,5, 23, 8, 2, 52, 0, 8, 18, 11, 3, 6, 10, 3, 9, 2 असा बाद झाला आहे. त्याने मागच्या 16 डावात फक्त एक अर्धशतक ठोकलं आहे. तर एकदा त्याला खातंही खोलता आलेलं नाही. 10 वेळा रोहित शर्मा एकेरी धावांवर बाद झाला. रोहित शर्माचा हा फॉर्म पाहता चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी मधल्या फळीवरच अवलंबून राहावं लागणार आहे. रोहित शर्मा झटपट बाद झाल्यानंतर मधल्या फळीची जबाबदारी वाढणार आहे. त्यामुळे तळाच्या गोलंदाजांना गोलंदाजीसोबत फलंदाजीवरही लक्ष केंद्रीत करावं लागणार आहे.
खरं तर रोहित शर्माला नागपूर वनडेत 24 धावा करून एक विक्रम रचण्याची सधी होती. माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक राहुल द्रविडचा विक्रम मोडण्यासाठी 24 धावांची गरज होती. मात्र रोहित शर्मा फक्त 2 धावा करून बाद झाला. आता दुसऱ्या वनडेत त्याला हा विक्रम मोडण्याची जबाबदारी असणार आहे. राहुल द्रविडने 344 वनडे सामन्यात 318 डावात 39.19 च्या सरासरीने 10898 धावा केल्या आहेत. तर रोहित शर्माने आज केलेल्या दोन धावांसह 266 वनडे सामन्यातील 258 डावात 49.1 च्या सरासरीने 10868 धावा केल्या आहेत.
रोहित शर्मा बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने डाव सावरला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरने चांगलाच घाम गाळला होता. त्या जोरावरच त्याने टीम इंडियात कमबॅक केलं आहे. त्याची चुणूक आंतरराष्ट्रीय सामन्यातही दिसून आली. त्याने जोरदार फटकेबाजी करत इंग्लंड संघाला अडचणीत आणलं. त्यामुळे आता त्याच्याकडून फार अपेक्षा वाढल्या आहेत.