IND vs PAK Head To Head Record: भारत-पाकिस्तान 'वन डे' मध्ये कोण आहे वरचढ? दुबईचा रेकॉर्ड पाहाल तर व्हाल हैराण, पण...
esakal February 22, 2025 03:45 PM

IND vs PAK head-to-head stats in UAE for Champions Trophy 2025 : आयसीसी तील बहुप्रतिक्षित सामना आता काही तासांवर आला आहे. कट्टर प्रतिस्पर्धी २३ फेब्रुवारीला दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांचा सुरुवातीच्या सामन्यात परस्परविरुद्ध अनुभव राहिला आहे. भारताने बांगलादेशवर सहा गडी राखून सहज विजय मिळवला, तर पाकिस्तानला न्यूझीलंडकडून ६० धावांनी पराभव पत्करावा लागला आहे.

पाकिस्तानसाठी हा सामना 'करो या मरो' असणार आहे, कारण पराभव झाल्यास त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते. आयसीसी स्पर्धांमध्ये पाकिस्तानचा भारताविरुद्धचा विक्रम समाधानकारक राहिलेला नाही आणि त्यामुळे त्यांचे चाहते चिंतीत आहेत. मात्र, त्यांना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरील मागील दोन विजयांमधून आत्मविश्वास मिळू शकतो. पाकिस्तानने हे दोन्ही विजय ट्वेंटी-२० सामन्यात मिळवले आहेत. २०२१ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानने भारतावर दहा गडी राखून ऐतिहासिक विजय मिळवला होता, तर २०२२ आशिया कपमध्येही त्यांनी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघावर मात केली होती.

संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील लढतींमध्ये पाकिस्तानचा भारतावर सरळ वरचष्मा आहे. या देशात झालेल्या २८ सामन्यांपैकी पाकिस्तानने १९ वेळा विजय मिळवला, तर भारत केवळ ९ वेळा जिंकू शकला. मात्र, दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या वनडे सामन्यांमध्ये भारताचा पाकिस्तानविरुद्धचा विक्रम शतप्रतिशत राहिला आहे.

  • भारत-पाकिस्तान यांच्यात एकूण १३५ वन डे सामने झाले आहेत आणि त्यात पाकिस्तानने ७३ सामन्यांत विजय मिळवला आहे. भारताला ५७ सामने जिंकता आले आहेत, तर ५ सामन्यांचा निकाल लागलेला नाही.

  • आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा रेकॉर्ड पाहता भारत-पाकिस्तान यांच्यात ५ सामने झाले आहेत आणि पाकिस्तान ३-२ अशा जय-पराजयाच्या आकडेवारीसह आघाडीवर आहे.

  • दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या दोन्ही सामन्यांत भारताने शेजाऱ्यांना पराभवाची चव चाखवली आहे.

  • संयुक्त अरब अमिरातीत भारत-पाकिस्तान यांच्यात एकूण २८ सामने खेळले गेले. शाहजाह येथे झालेल्या २४ पैकी १८ सामन्यांत पाकिस्तान, तर ६ सामन्यांत भारत जिंकला. दुबईत भारताने दोन्ही सामने जिंकले, तर अबु धाबीत २ पैकी प्रत्येकी १-१ सामने दोन्ही संघांनी जिंकला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.