बनावट नोटा छपाईप्रकरणी केंद्रीय पथकाकडून कळंब्यात छापा; हाँगकाँगवरून मागवले विशेष पेपर, पदवीधर तरुणाला अटक
esakal February 22, 2025 03:45 PM

भारतात सहजरित्या न मिळणारा पेपर थेट हॉंगकॉंगवरून मागविण्यात आला होता. त्यावर केलेली छपाई सहज पकडली जात नसल्याने संशयित घाटगेने हा पेपर मागवला असल्याचे तपासात समोर आले.

कोल्हापूर : बनावट नोटा छपाईसाठी (Printing Fake Notes) हाँगकाँगवरून (Hong Kong) साहित्य मागविणाऱ्या सिद्धेश श्रीकांत घाटगे (वय २६, रा. दत्तोबा शिंदेनगर, कळंबा) याच्या घरावर केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (Central Directorate of Revenue Intelligence) पथकाने गुरुवारी छापा टाकला. त्याच्या घरातून हाय सिक्युरिटी थ्रेड पेपर व साहित्य जप्त करण्यात आले.

ए-फोर साईज पेपरवर पाचशे, दोनशे व पन्नास रुपयांच्या नोटांची छपाई केल्याचे आढळून आले. करवीर पोलिसांच्या मदतीने त्याला अटक करण्यात आली असून, आणखीन एकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. संशयित घाटगेला २५ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याचे निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : परदेशी चलन, भारतीय चलनी नोटांसह महसूल संबंधित गोष्टींवर केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाचे लक्ष असते. कळंबा येथील एकाने हॉंगकॉंगवरून हाय सिक्युरिटी थ्रेड पेपर कुरिअरने मागविल्याची माहिती या विभागाला मिळाली होती. मुंबई व पुणे येथील पथकाचे अधिकारी गुरुवारी सकाळी कोल्हापुरात दाखल झाले. त्यांनी करवीर पोलिसांच्या मदतीने कळंबा येथील संशयित सिद्धेश घाटगे याच्या घरावर छापा टाकला. दरम्यान, या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक नाथा गळवे करीत आहेत.

नोटा छापलेले चार पेपर जप्त

संशयित घाटगेच्या घरात चार ए-फोर साईज पेपर या पथकाला मिळाले. एका पेपरवर पाचशे रुपयांच्या, दुसऱ्यावर दोनशे रुपयांच्या, तिसऱ्या पेपरवर पन्नास रुपयांच्या नोटांची छपाई करण्यात आली होती. चौथ्या पेपरवर नोटांमधील रंगीत पट्टी, आरबीआय व भारत अशी अक्षरे छापल्याचे मिळून आले. पोलिसांनी हे सर्व साहित्य जप्त केले.

कुरिअरवरून मागविले विशेष पेपर

भारतात सहजरित्या न मिळणारा पेपर थेट हॉंगकॉंगवरून मागविण्यात आला होता. त्यावर केलेली छपाई सहज पकडली जात नसल्याने संशयित घाटगेने हा पेपर मागवला असल्याचे तपासात समोर आले. भारतात असे पेपर मागविणाऱ्यांवर महसूल गुप्तचर संचालनालयाची नजर असते. यामुळेच पथकाचा संशय खरा ठरला आहे; मात्र, त्याच्या घरी केवळ चार पेपर मिळून आले असून, उर्वरित पेपर त्याने कोणाला दिले, याचा तपास सुरू आहे.

पदवीधर, तरीही दुचाकी मेकॅनिकल..

संशयित घाटगेचे मूळ गाव करवीर तालुक्यातील चुये आहे. त्याच्या वडिलांचे निधन झाले असून, तो आईसोबत कळंबा येथे राहतो. त्याचे शिक्षण पदवीपर्यंत झाले, तरी तो दुचाकी दुरूस्तीची कामे करत होता. किरकोळ कामे करूनच तो घर चालवत होता. अशात त्याने नोटांची छपाई कोणाकडून शिकून घेतली, याची माहिती पोलिस घेत आहेत. छपाई कोठे झाली, त्याचे साथीदार कोण, नोटा खपविल्या आहेत का, अशा अनुषंगाने माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

आणखीन एक संशयित ताब्यात

नोटा छपाईसाठी मागविलेला पेपर कुरिअरद्वारे संशयित सिद्धेश घाटगेच्या घरी पोहोचला होता. केंद्रीय पथकाला याची माहिती मिळताच महसूल गुप्तचर संचालनालयाचे पवनकुमार जयस्वाल (वय ४३, रा. पणजी) यांच्या पथकाने कोल्हापुरात पोहोचून खातरजमा केली. घाटगेच्या घरी बनावट नोटा छापलेला कागदही मिळून आल्याने यामागे मोठे रॅकेट असल्याची शक्यता उघड झाली. रात्री उशिरा आणखीन एकाला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.