वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील दहावा सामना गुजरात जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरु आहे. नाणेफेकीचा कौल जिंकून दिल्ली कॅपिटल्सने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या स्पर्धेतील ट्रेंड पाहता प्रथम गोलंदाजी करणं हे फायद्याचं दिसत आहे. कारण दुसऱ्या डावात पडत असलेलं दव पाहता गोलंदाजी करणं कठीण होतं. तसेच दिलेल्या धावांचा पाठलाग करणंही सोपं होतं. दरम्यान, गुजरात जायंट्सला मोठी धावसंख्या करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे पॉवरप्लेमध्ये आक्रमक फलंदाजी गरजेची होती. मात्र गुजरात डाव पत्त्यासारखा कोसळला. पॉवरप्लेमध्ये चार महत्त्वाचे गडी गमववण्याची वेळ आली. त्यामुळे गुजरातवरील दडपण वाढलं आणि त्यातून सावरणं कठीण झालं. तळाशी आलेल्या भारती फुलमाळीने 29 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने नाबाद 40 धावा केल्या. तिच्या या खेळीमुळे गुजरात जायंट्सने 20 षटकात 9 गडी गमवून 127 धावांपर्यंत मजल मारता आली. दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी 128 धावांचं आव्हान आहे. गुजरात जायंट्सला हरलीन देओलच्या रुपाने पहिला धक्का बसला. फक्त 5 धावा करून बाद झाली. त्यानंतर आलेली फोबे लिचफिल्ड काही खास करू शकली नाही. तिला आपलं खातंही खोलता आलं नाही.
संघावर आलेलं दडपण दूर करण्यासाठी खरं तर बेथ मूनीवर दडपण आलं होतं. पण अवघ्या 10 धावा करून शिखा पांडेने तिला तंबूत पाठवलं. एशले गार्डनर या सामन्यात स्वस्तात बाद झाली आणि तिला फक्त 3 धावा करता आल्या. कश्वी गौतमला खातही खोलता आलं नाही. डिएनड्रा डॉटीनने आक्रमक खेळी केली. तिने 24 चेंडूत 5 चौकाराच्या मदतीने 26 धावा केल्या.
गुजरात जायंट्स महिला (प्लेइंग इलेव्हन): बेथ मुनी (विकेटकीपर), हरलीन देओल, फोबी लिचफील्ड, ॲशले गार्डनर (कर्णधार), डिआंड्रा डॉटिन, सिमरन शेख, तनुजा कंवर, भारती फुलमाली, काशवी गौतम, प्रिया मिश्रा, मेघना सिंग.
दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, मेग लॅनिंग (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, मॅरिझाने कॅप, अॅनाबेल सदरलँड, जेस जोनासेन, सारा ब्राइस (विकेटकीपर), निकी प्रसाद, शिखा पांडे, तितस साधू, मिन्नू मणी.