अकोला - ग्रामपंचायत रेकॉर्डमध्ये घराच्या नावांतरणासाठी तीन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सरपंच पतीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सापळा रचून अटक केली आहे.
याप्रकरणी सविस्तर असे की, तक्रारदार (३६, रा. गोंदापूर, अकोला) यांच्या वडिलांनी ग्राम सालतवाडा (ता. मूर्तिजापूर, जि. अकोला) येथील आपल्या पक्क्या घराचे बक्षीसपत्राद्वारे नावांतरण केले. हे नावांतरण ग्रामपंचायत रेकॉर्डवर नोंदविण्यासाठी सरपंच पती देवानंद गणपत जामनिक (५७, रा. उमई, ता. मूर्तिजापूर) यांनी ३,०००/- रुपयांची लाच मागितली, अशी तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.
तक्रारीच्या पडताळणीदरम्यान १,०००/- रुपये लाच स्वीकारण्याचे आरोपीने मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे २७ फेब्रुवारी रोजी मूर्तिजापूर बसस्थानकाजवळ सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून पंचांसमक्ष १,०००/- रुपये स्वीकारताना आरोपी रंगेहात सापडल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले.
आरोपीविरुद्ध मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईत पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे, पोलीस उपअधीक्षक मिलिंदकुमार बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन सावंत व त्यांच्या पथकाने सहभाग घेतला.